…म्हणून ‘या’ शेतकऱ्याची थेट उपजिल्हाधिकाऱ्यांकडेच गांजा लागवडीसाठी परवानगीची मागणी

गांजाला चांगला भाव असल्यामुळे दोन एकर गांजा लागवड करण्याची परवानगी द्यावी किंवा शेतकऱ्यांना हमीभाव तरी द्यावा, अशी मागणी अनिल पाटील या शेतकऱ्याने केली आहे.

  मोहोळ / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : सध्याच्या घडीला शेतीमालाला भाव नसल्याने स्वत:ची व इतर शेतकऱ्यांची अर्थिक परिस्थिती पाहता बाकीच्या शेतकऱ्यांचा विचार करून अनिल आबाजी पाटील यांनी सर्व शेतकरी बांधवांना प्रती दोन एकर गांजा लागवडीसाठी परवानगी द्यावी किंवा आमच्या शेतीमालाला ठोक हमीभाव द्यावा अशी मागणी सोलापूरच्या उप जिल्हाधिकारी यांना भेटून निवेदनाद्वारे केली आहे.

  त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शेतीमालाला सध्याच्या घडीला योग्य हमीभाव नसल्याने घेतलेले पीक कवडीमोल किमतीला विक्री करावे लागत असल्याने शेतकऱ्यांचा आर्थिक कणा मोडला आहे. त्यामुळे चालू हंगामात आम्हा शेतकऱ्यांना गांजा पिकवण्यासाठी परवानगी द्यावी.

  एखादे पीक घेतले तरी त्याला शासनाचा हमी भाव नसल्यामुळे शेती तोट्यात करावी लागत आहे. शेतीमालाला कवीडमोल भाव मिळत असल्यामुळे शेती करणे कठीण झाले आहे. मशागतीसाठी केलेला खर्च देखील मिळत नाही.

  तसेच एखाद्या साखर कारखान्याला ऊस गाळपासाठी दिला असता त्याचे बिल देखील लवकर मिळत नाही. त्यामुळे गांजाला चांगला भाव असल्यामुळे दोन एकर गांजा लागवड करण्याची परवानगी द्यावी किंवा शेतकऱ्यांना हमीभाव तरी द्यावा, अशी मागणी अनिल पाटील या शेतकऱ्याने केली आहे.

  शेतकऱ्यांना पीकाचे उत्पन्न किती येईल हे शेवटपर्यंत कळत नाही. म्हणजेच शेतकऱ्यांना आपल्या पिकाचा दर ठरविण्याचा देखील अधिकार नाही, सध्या भाव नसल्याने टोमॅटो रस्त्यावर फेकण्याची पाळी शेतकऱ्यांवर आली आहे. शेतकऱ्याच्या शेतीमालाला हमीभाव मिळावा किंवा गांजा लागवडीसाठी परवानगी मिळावी ही आमची मागणी आहे.

  – अनिल पाटील, शेतकरी, शिरापूर (सो) ता. मोहोळ, जि. सोलापूर