एससी, एसटी प्रवर्गाला पदोन्नतीमध्ये आरक्षण द्या; मोहोळ रिपाइच्या वतीने निवेदन

    मोहोळ : एससी, एसटी प्रवर्गाला पदोन्नतीमध्ये आरक्षण द्यावे, या मागणीसाठी मोहोळ तहसील कार्यालय येथे आरपीआय (आ) च्या वतीने जिल्हाध्यक्ष अशोक सरवदे यांच्या नेतृत्वाखाली मोहोळचे तहसीलदार जीवन बनसोडे यांना निवेदन देण्यात आले.

    रिपाइंच्या वतीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पदोन्नतीमध्ये आरक्षण हा मागासवर्गीयांचा हक्क आहे. सर्वोच्च न्यायालयाने पदोन्नतीमध्ये आरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेण्याचे निर्देश दिले आहे. मात्र, महाराष्ट्र सरकारने ७ मे २०२१ रोजी शासन निर्णय काढून त्याला स्थगिती दिली. हा मागासवर्गीय कर्मचाऱ्यांवर अन्याय आहे. उलट राज्य सरकारने सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नती आरक्षण देऊन मागासवर्गीयांवर अन्याय केलेला आहे. तरी सदर मागासवर्गीय पदोन्नती आरक्षण पूर्वीप्रमाणे द्यावे व शासनाने केलेला आरक्षण पदोन्नतीचा शासन निर्णय रद्द करावा. अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल.

    सदरचा शासन निर्णय रद्द करुन पदोन्नतीमध्ये आरक्षण देण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने त्वरित घ्यावा, या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) मोहोळ शहर व तालुका यांच्या वतीने तहसीलदार बनसोडे यांना निवेदन देण्यात आले.

    यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष अशोक सरवदे, तालुकाध्यक्ष गौतम क्षीरसागर, युवक तालुका अध्यक्ष राहुल तावसकर, सत्यवान जौजट, अमोल कापुरे, अनिल महाळनोर, बंडू शिंदे, शिवाजी सरवदे, बालाजी शिरसट आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.