खरीप हंगाम पूर्व शेतकऱ्यांना बी-बियाणे खते वेळेत द्या : विजयकुमार देशमुख

    सोलापूर : यंदा पाऊस मान चांगला असून येणाऱ्या काही दिवसांमध्ये शेतकरी खरीप हंगाम पेरणीला सुरुवात करणार आहे. तत्पूर्वी शेतकऱ्यांना लागणाऱ्या खरीप हंगामासाठी बी-बियाणे व खते वेळेत उपलब्ध करून देण्याच्या सूचना आमदार विजयकुमार देशमुख यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

    खरीप हंगाम पूर्व तयारीसाठी उत्तर सोलापूर तालुक्यातील बैठक सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमधील सभागृहात आमदार देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. या प्रसंगी आमदार देशमुख यांनी उत्तर सोलापूर तालुकासाठी लागणारे बियाणे व खते याचा आढावा घेऊन या सूचना दिल्या.

    उत्तर सोलापूर तालुक्याचे तूर पिकाचे एकूण क्षेत्र २४०० हेक्टर इतके आहे. त्यासाठी ५४ क्‍विंटल बियाणे लागणार असून, केवळ ३७ क्विंटल बियाणे सध्या उपलब्ध आहेत. तसेच मुगाचे एकूण क्षेत्र ३२० असून पाच क्विंटल बियाण्याची गरज आहे. तर १३ क्विंटल बियाणे उपलब्ध आहे. त्यामुळे मुगाचे बियाणे पुरेशा प्रमाणात आहे. बाजरी पिकाचे एकूण क्षेत्र ६० हेक्टर असून बियाणे दोन क्विंटलची गरज आहे. सध्या बाजरीचे सात क्विंटल बियाणे उपलब्ध आहे. उडीदचे एकूण क्षेत्र ७५० इतके आहे. त्यासाठी बियाणे १७ क्विंटल लागतात. तरी सध्या ४० क्विंटल बियाणे उपलब्ध आहेत.

    सोयाबीन पिकाची लागवड अडीच हजार हेक्टरवर करण्यात येणार असून, त्यासाठी बियाणे ६५६ क्विंटल लागणार आहे. तर सध्या केवळ ३७४ क्विंटल बियाणे उपलब्ध आहे. भुईमुग या पिकाची लागवड २५० हेक्टरवर करण्यात आले असून, बियाणे ७५ क्विंटल आवश्यकता आहे. परंतु केवळ ३६ क्विंटल बियाणे उपलब्ध आहे. सूर्यफूल पिकाची पेरणी ३० हेक्‍टरवर करण्यात येणार असून, त्यासाठी दोन क्विंटल बियाणे लागणार आहे. तरी सध्या १९ क्विंटल सूर्यफूलचे बियाणे उपलब्ध आहे. कांदा पिकाची लागवड १३०० हेक्‍टरवर करण्यात येणार असून, त्यासाठी ५२ क्विंटल बियाणे लागणार आहेत. परंतु सध्या केवळ ६ क्विंटल बियाणे उपलब्ध आहे. त्यामुळे कांदा बियाणाचा तुटवडा भासणार आहे. याबरोबर युरिया व डीएपी खताची उपलब्धता हे खूपच कमी आहे.

    तरी उत्तर सोलापूर तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना पुरेशा प्रमाणात खते व बियाणे उपलब्ध व्हावे यासाठी जिल्हाधिकारी यांच्याशी स्वतः चर्चा करून अधिक बियाणे व खते उपलब्ध करण्याचे नियोजन करण्यात येणार असल्याचेही आमदार देशमुख यांनी सांगितले. यावेळी बाजार समितीचे उपसभापती श्रीशेल नरोळे, संचालक बसवराज इटकळे, संचालक बाळासाहेब शेळके, संचालक शिवानंद पुजारी, आदी उपस्थित होते.