लगीन लागलं देवाचं … विठ्ठल रुक्मिणीचा विवाह सोहळा थाटात

वसंत पंचमीच्या शुभ मुहूर्तावर विठ्ठल रुक्मिणीचा शाही विवाह सोहळा साजरा करण्यात आला. 'सोन्याच बाशिंग लगीन देवाच लागलं...' या उत्साहात आज (१६ फेब्रुवारी) दुपारी १२ वाजता हा लग्न सोहळा पार पडला.

    पंढरपूर : आज दि. १६ रोजी वसंत पंचमीच्या दिवशी श्री विठ्ठल रुक्मिणी विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. वसंत पंचमीच्या दिवशी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास श्री विठ्ठल रखुमाई यांचा विवाह सोहळा संपन्न झाला. या निमित्ताने सभामंडपात आकर्षक सजावट करण्यात आली होती. कोरोना विषयक सर्व नियम पाळून या सोहळ्यास मोजके लोक उपस्थित होते.

    मंदिर समितीच्या वतीने विवाहाची जय्यत तयारी करण्यात आली होती. पाच विविध रंगांच्या फुलांनी मंदिर सजविले गेले होते. तर वधु-वरांसाठी विवाहाचा पेहराव बेंगलोर येथील प्रसिद्ध फॅशन डिझायनर सविता चौधरी यांनी डिझाईन करून अर्पण केला आहे. श्री विठ्ठलासाठी पांढऱ्या रंगाची अंगी व उपरणे बनवण्यात आले होते. यावर विष्णूच्या शुभ खुणा असलेला शंख, चक्र व विविध रंगांच्या रंगीबेरंगी मोत्यांपासून बनवण्यात आले होते. रुक्मिणी मातेलाही अतिशय उंची सिल्कची कांजीवरम साडी निवडण्यात आली होती.

    पुण्यातील फुल सजावटीची सेवा देणारे भारत भुजबळ यांनी पाच टन फुलांनी मंदिर सजवले होते. यात थोरीयम, विविध रंगी गुलाब, आरकेड, जरबेरा, मोगर्‍याचा 36 प्रकारच्या फुलांचा वापर करण्यात आला होता. श्री विठ्ठल रुक्मिणी विवाह सोहळा साजरा करण्यासाठी मंदिर समितीसह अध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर, कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनीही देवाच्या लग्नात मंगलाष्टका म्हटल्या. व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांच्यासह मंदिरातील कर्मचारी यावेळी उपस्थित होते.