‘महाराष्ट्र बंद’ला पंढरपुरातून संमिश्र प्रतिसाद

    पंढरपूर : उत्तर प्रदेश येथील लखीमपूर येथे शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घालून चिरडून हत्या झाल्याची घटना घडली होती. या घटनेमुळे सबंध देशभरात संतापाची लाट पसरली होती. याबाबत सोमवारी महाविकास आघाडीच्या वतीने घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. याला पाठिंबा देण्यासाठी पंढरपूर येथील महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी येथील छत्रपती शिवाजी चौकामध्ये एकत्र येत सदर घटनेचा निषेध व्यक्त केला.

    केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली आणि याबाबतचे निवेदन प्रशासनास देण्यात आले. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे, शहरप्रमुख रवि मुळे, तालुकाप्रमुख महावीर देशमुख, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुधीर भोसले, श्रीकांत शिंदे, श्रेया भोसले, संदिप मांडवे, काँग्रेसचे राजेश भादुले, समीर कोळी, सागर कदम आदी उपस्थित होते.

    महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी रॅली काढून दुकाने बंद करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवून बंदला पाठिंबा दर्शविला होता.

    लखीमपुर घटनेच्या निषेधार्थ राज्यातील महाविकास आघाडी सरकारने सोमवारी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. याला पाठिंबा देण्यासाठी पंढरपूर येथील महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी पंढरपूरात दुकाने बंद करण्याचे आवाहन केले. यानंतर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे एकत्र येत केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत केंद्र सरकारचा निषेध केला. या महाराष्ट्र बंदला पंढरपूरात संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचे पहावयास मिळाले.

    दरम्यान, सकाळपासूनच शहरातील अत्यावश्यक वस्तूंची दुकाने तसेच एसटी वाहतूक सुरू असल्याने प्रवाशांना दिलासा मिळाल्याचे पाहावयास मिळाले.