‘डेल्टा प्लस’चा प्रभाव रोखण्यासाठी शासनाकडून सर्वोतोपरी प्रयत्न सुरु : जिल्हाधिकारी शंभरकर

    टेंभुर्णी : डेल्टा प्लस व्हेरीयंट या कोरोना विषाणूच्या तिसऱ्या लाटेचा प्रभाव रोखण्यासाठी शासनाकडून सर्वोतोपरी प्रयत्न सुरू असून आत्तापर्यंत दीड वर्षे टेंभुर्णी येथील ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पामुळे अनेकांचे जीव वाचविण्यात शासनास मदत झाली आहे. याचप्रकारे तिसऱ्या लाटेतही ऑक्सिजन कंपन्यांनी चांगली कामगिरी करून शासनास मदत करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले आहे.

    डॉ. शंभरकर यांनी टेंभुर्णी औद्योगिक वसाहत येथील एस.एस.बॅग्ज या राजाभाऊ शिंदे यांच्या ऑक्सिजन गॅस प्रकल्पास व नव्याने उभारण्यात येत असलेल्या विजय इंडस्ट्रीयल गॅस प्रा.लिमिटेड या व विजय एअर प्रोडक्टस या उभारणी सुरु असलेल्या रेफलिंग स्टेशनला भेट देऊन प्रकल्पाच्या तयारी विषयी माहिती घेतली. तसेच प्रकल्प संचालकाना डेल्टा प्लस व्हेरीयंट या कोरोना विषाणूचा धोका टाळण्यासाठी शासनास मदत करण्याचे व शासनाच्या कोरोना विरोधी मोहिमेसाठी सज्ज राहण्याचे आदेश दिले. प्रकल्पाची क्षमता वाढविण्याचे आदेश दिले.

    जिल्हाधिकारी डॉ.शंभरकर यांनी प्रकल्पाविषयीच्या अडचणी, समस्या जाणून घेतल्या. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.मिलिंद शंभरकर यांच्यासोबत तहसीलदार राजेश चव्हाण, एस.एस.बॅग्ज प्रा.लि.चे राजाभाऊ शिंदे, मंडल अधिकारी मनिषा लकडे, तलाठी स्वप्नील सोनटक्के, सचिन साळुंखे,निलमकुमार पांडे, देविदास कुबेर हे उपस्थित होते.