मोहोळ तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतींचे अनगर नगरपंचायतीमध्ये होणार रुपांतर

मोहोळ तालुक्यातील अनगरसह कोंबडवाडी, खंडोबाचीवाडी, नालबंदवाडी आणि कुरणवाडी या पाच ग्रामपंचायतींचे अनगर नगरपंचायतीमध्ये रूपांतर करण्याचा निर्णय राज्य नगरविकास विभागाने घेतला आहे.

    मोहोळ / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : मोहोळ तालुक्यातील अनगरसह कोंबडवाडी, खंडोबाचीवाडी, नालबंदवाडी आणि कुरणवाडी या पाच ग्रामपंचायतींचे अनगर नगरपंचायतीमध्ये रूपांतर करण्याचा निर्णय राज्य नगरविकास विभागाने घेतला आहे. तशी अधिसूचना शासनाने १४ सप्टेंबर रोजी जारी केली आहे. याबाबत लेखी सूचना व हरकती मागवल्या असून ३० दिवसांच्या आत जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे सूचना व हरकती सादर कराव्यात, असे नगरविकास विभागाने स्पष्ट केले आहे.

    याचवर्षी राज्य शासनाने वैराग, नातेपुते तसेच श्रीपूर ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर केले. त्यापूर्वी माढा आणि माळशिरस या दोनच नगरपंचायती होत्या. नव्याने जाहीर झालेल्या श्रीपूर, नातेपुते तसेच वैराग या तीन नगरपंचायतींसह आता एकूण पाच नगरपंचायती झाल्या. आता यात अनगर नगरपंचायतची भर पडणार आहे.

    अनगर परिसरातील वाढती लोकसंख्या तसेच ग्रामपंचायत पातळीवरील विकास कामाबाबत येणाऱ्या अडचणी लक्षात घेता अनगर ग्रामपंचायतीचे अनगर नगरपंचायत करावी तसा ठराव ग्रामपंचायतींच्या सभेत घेण्यात आला. त्यानुसार शासनाकडे २५ जूनला प्रस्ताव पाठविला. यामध्ये अनगरसह परिसरातील कोंबडवाडी खंडोबाचीवाडी, नालबंदवाडी, कुरणवाडी ग्रामपंचायतींचा समावेश होता. प्रस्तावानुसार राज्याच्या नगरविकास विभागाने १४ सप्टेंबर रोजी याबाबतची अधिसूचना शासनाचे उपसचिव सतीश मोघे यांनी जारी केली आहे.

    पुढील ३० दिवस लोकांच्या सूचना आणि हरकती मागवणार आहोत. आलेल्या लेखी सूचना व हरकतींवर सुनावणी होईल. निकाल अहवाल नगरविकास विभागाकडे पाठवणार आहे. त्यानंतर अनगर नगरपंचायतीबाबत राज्य शासन अंतिम निर्णय जाहीर करणार आहे.

    – आशिष लोकरे, प्रशासनाधिकारी, सोलापूर

    अनगर परिसरातील लोकांच्या सोयी सुविधा व विकासासाठी ग्रामपंचायतीचे अनगर ही नगरपंचायतमध्ये रुपांतर व्हावी, ही सर्वांची इच्छा होती. लोकांच्या मागणीनुसार आम्ही शासनाकडे पाठपुरावा केला. यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समिती गणातून ही गावे कमी होतील. राजकीय दृष्टीने काहीसा फटका बसत असला तरी लोकांच्या दृष्टीने चांगला निर्णय शासनाने घेतला आहे.

    – राजन पाटील, माजी आमदार, मोहोळ