मोहोळ तालुक्यात गारपिटीने शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान

अचानक आलेल्या पावसाने मोहोळ तालुक्यातील सारोळे, वाफळे, देवडी, सिद्धेवाडी, हिवरे, चिखली, वडाचीवाडी, कोन्हेरी, तसेच कामती परिसरातील वाघोली, सोहाळे या गावांना अक्षरशः झोडपून काढले. यामध्ये वाऱ्याची तीव्रता एव्हढी होती की, मोठी झाडे, फळ झाडे यांचा पाला गळून पडला तर फळ पिकांचे झाडाखाली अंथरूण झाले होते. भरात आलेले आंबे, डाळिंब, चिंच यासह फळ बागांचे अंथरूण झाले होते. तर मका, कडवळ, कलिंगड, खरबूज आदि धान्ये जमिनीवर लोळण घेत आहेत. पावसात पडणाऱ्या गारांमुळे परिसर पांढरा शुभ्र दिसत होता. तर गुरांचे गोठे, पत्रे उडून गेले व भाजीपाल्या साठी उभे केलेले मांडव जमिनीवर आडवे झाले. यामध्ये वाफळे येथे ऐन भरात आलेल्या भगवान दाढे यांच्या पाच एकर डाळिंब बागेचे नुकसान झाले आहे.

    मोहोळ:गेल्या वर्षाभरापासून कोरोनाच्या आपत्कालीन परिस्थितीत संकटांचा सामना करणाऱ्या जनतेला गुरुवारी दुपारी वादळी गारांच्या पावसाने झोडपून काढले. यामध्ये शेतकऱ्यांच्या दाळिंब, द्राक्षे, आंबा, चिंच यासह अनेक पिकांचे मोठ्या प्रमाणात करोडो रुपयांचे नुकसान झाले असून शेतकऱ्यांच्या फळ पिकांचे अक्षरशः अंथरूण झाले असून याची पाहणी व पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

    दि.२९ एप्रिल रोजी दुपारी अचानक आलेल्या पावसाने मोहोळ तालुक्यातील सारोळे, वाफळे, देवडी, सिद्धेवाडी, हिवरे, चिखली, वडाचीवाडी, कोन्हेरी, तसेच कामती परिसरातील वाघोली, सोहाळे या गावांना अक्षरशः झोडपून काढले. यामध्ये वाऱ्याची तीव्रता एव्हढी होती की, मोठी झाडे, फळ झाडे यांचा पाला गळून पडला तर फळ पिकांचे झाडाखाली अंथरूण झाले होते. भरात आलेले आंबे, डाळिंब, चिंच यासह फळ बागांचे अंथरूण झाले होते. तर मका, कडवळ, कलिंगड, खरबूज आदि धान्ये जमिनीवर लोळण घेत आहेत. पावसात पडणाऱ्या गारांमुळे परिसर पांढरा शुभ्र दिसत होता. तर गुरांचे गोठे, पत्रे उडून गेले व भाजीपाल्या साठी उभे केलेले मांडव जमिनीवर आडवे झाले. यामध्ये वाफळे येथे ऐन भरात आलेल्या भगवान दाढे यांच्या पाच एकर डाळिंब बागेचे नुकसान झाले आहे. तसेच सोहाळे येथील द्राक्ष बागायतदार गणेश जगताप यांच्याही द्राक्ष बागेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

    गत एका वर्षापासून कोरोनाच्या परिस्थितीत शेतकरी अडचणीत असतानाच शेतकऱ्यांपुढे या गारांच्या वादळी पावसाचे अस्मानी संकट उभे ठाकले आहे. ७० रुपये प्रतिकिलो बाजार भाव मागणी असलेल्या माझ्या पाच एकर द्राक्ष बागेचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. तरी शासनाच्या वतीने या भागातील सर्वांच्या झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून त्याची नुकसान भरपाई त्वरित द्यावी.

    -गणेश जगताप , नुकसानग्रस्त शेतकरी, सोहाळे