थकित एफआरपी, ऊस वाहतुकीचे भाडे व विविध समस्यांबाबत शरद पवारांसोबत बैठक लावा; देशमुख यांची मागणी

थकित एफआरपी, ऊस वाहतुकीचे भाडे व विविध समस्यांबाबत शरद पवारांसोबत बैठक लावण्याची प्रभाकर देशमुख यांनी सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

  मोहोळ / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : थकित एफआरपी, ऊस वाहतुकीचे भाडे व विविध समस्यांबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांसोबत बैठक लावण्याची प्रभाकर देशमुख यांनी सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

  देशमुख यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, थकित एफआरपीची रक्कम त्वरीत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करा, तीन टप्प्यातील एफआरपी त्वरित रद्द करा व एक रकमी एफआरपी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा, ऊस वाहतूक ट्रॅक्टर मालकाचे थकीत भाडे द्या व ऊस वाहतुकीच्या भाड्यात त्वरित वाढ करावी. कारण महिन्याला डिझेलमध्ये भरमसाठ वाढ होते व ऑटोमोबाईल, स्पेअर्स पार्ट, टायर यांच्या किमती वरचेवर वाढतच आहेत.

  सध्याच्या परिस्थितीत ड्रायव्हरचा पगार देणेही ट्रॅक्टर मालकाला परवडत नसल्याने त्याला वाहतुकीच्या भाड्यात वाढ द्यावी, व पंधरा दिवसात ट्रॅक्टर वाहनाचे भाडे खात्यावर जमा करण्याचा कायदा करावा. तसेच ऊसापासून पडलेल्या साखरेवर पहिल्यांदा शेतकऱ्याचा हक्क असावा असा कायदा करावा, नंतर कारखानदारांनी राहिलेल्या साखरेवरती बँकेचे त्याच्यावर कर्ज काढावे अशीही मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे प्रभाकर देशमुख यांनी केली आहे.

  देशाचे नेते शरद पवार हे दोनशे ते तीनशे कोटी कर्ज थकीत असलेल्या कारखान्यांच्या संबंधितांची बैठक घेऊन त्यांना ५० कोटी ते १०० कोटी रु कर्ज मंजूर करतात. परंतु शेतकरी बिचारा एक लाखाच्या कर्जासाठी बँकेत हेलपाटे घालतो, कागदपत्रे फाईल व्यवस्थित असून सुद्धा बँक कर्ज देत नाही.

  याबाबतीतही शरद पवार यांनी बोलले पाहिजे, कारखानदार थकित एफआरपीची रक्कम आठ ते दहा महिने देत नाहीत. त्याबाबत देखील त्यांनी कारखानदारांना जाब विचारावा, विविध संघटनांनी साखर कारखानदारांच्या विरोधात आंदोलन केल्यानंतर साखर आयुक्त व जिल्हाधिकारी आरआरसीची कारवाई करून उसाची थकीत बिले देण्यासाठी गोडाऊनची साखर जप्त करून विक्रीसाठी काढतात.

  परंतु, गोडाऊनमधल्या साखरेवरती बँकांचे कर्ज कारखानदारांनी काढल्यामुळे बँकेचे अधिकारी जिल्हाधिकाऱ्यांना अडवतात व आमच्या बँकेचे दोनशे ते तीनशे कोटी साखरेवर कर्ज आहे म्हणत एक साखरेचं पोतेही विक्री करू देणार नसल्याचा पवित्रा घेतात, असे असेल तर कष्टकरी शेतकऱ्यांची उसाची थकीत बिले मिळणार कशी? ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे प्रपंच चालणार कसे? त्यांचं कुटुंब जगणार कसं? असे सवाल देखील देशमुख यांनी पवारांना विचारले आहेत.