माढ्यासह परिसरातील गावात जोरदार पाऊस 

  माढा : माढा शहरासह परिसरातील गावात शनिवारी सायंकाळी जोरदार हजेरी लावली. शनिवारी सायंकाळी ७.३० वाजता सुरु झालेला पाऊस रविवारी पहाटे पर्यंत सुरुच होता.

  रविवारी सकाळी ८ पर्यत तालुक्यात ४८.७७ मि.मी पावसाची नोंद झाली आहे. रविवारी दुपारी देखील पाऊस झाला.

  उंदरगावातील सीना नदीचे पात्र देखील दुथडी भरुन वाहु लागले असुन रविवारी सायंकाळी पुन्हा पाऊस झाल्यास पुलावरुन पाणी वाहणार आहे. तसेच सीना नदीवरील दारफळ,निमगाव,केवड गावातील बंधारे तुडूंब भरले असुन बंधाऱ्याच्या पुलावरुन देखील पाणी वाहु लागल्याने गावाचा संपर्क तुटण्याची शक्यता आहे.

  तसेच सीना नदीच्या पात्राच्या काठी असलेल्या वाकाव,उंदरगाव,कुंभेज गावात पाणी शिरण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

  दरम्यान, या पावसाचा फटका शेतकर्याना बसला असुन शेतातील उभी पिके पावसाने वाहुन गेली आहेत.पावसाने शहरातील सखल भागात पाणी साठले होते.

  ग्रामीण भागात ओढे,तलाव,बंधारे दुथडी भरुन वाहु लागलेत.पावसाच्या भीतीने तालुक्यातील शेतकर्यानी उडीद काढणीला प्राधान्य दिले होते.

  शेतात वाळु घेतलेला आणी काढणीला आलेल्या उडीदाचे पिक पावसाने सोबत वाहुन नेले आहे.

  त्यामुळे ऐन काढणीला हाता तोडांशी आलेला उडीदाचे पीक भुईसपाट झाले आहे.तसेच तुरीचे पिक देखील वाहुन गेले.याचा मोठा आर्थिक फटका शेतकर्याना बसला आहे.

  उपळाई(खुर्द)शिवारातील अविनाश तिपेय,दत्तात्रय तिपे,नागनाथ कदम, राजेंद्र गुंड या शेतकर्यासह तालुक्यातील अनेक शेतकर्याचा ऊस खाली झोपला होता.माढा व दारफळ मंडळ मध्ये सर्वाधिक ८३.२ तर रांझणी मंडळ मध्ये १० मि.मी इतका सर्वात कमी पाऊस झाला आहे.

  उडीद अन् नदी काठच्या मोटारी गेल्या वाहुन

  शेतात काढणीला आलेल्या उडीद पिक या जोरदार पावसाने वाहुन गेलाय.तर सिना नदीच्या दारफळ, उंदरगाव, निमगावसह अन्य नदीकाठच्या अनेक शेतकर्याच्या मोटारी वाहुन गेल्या असुन तर काही शेतकर्याच्या मोटारी पाण्यात भिजुन नुकसान झाले आहे.