माळशिरस तालुका पतसंस्थेत ऐतिहासिक निर्णय; महिलांच्या हाती सोपवला संस्थेचा कारभार

  अकलुज : माळशिरस तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेची स्थापना 1928 सालची असून 94 वर्षात पहिली महिला चेअरमन होण्याचा मान कविता अशोक बनसोडे-मोरे यांना मिळाला. महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार पतसंस्थेचा कारभार सुरु आहे.

  महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे माजी राज्याध्यक्ष बाळासाहेब काळे, शिवानंद भरले, उत्तमराव जमदाडे यांचे मार्गदर्शनाखाली संचालक मंडळ, ज्येष्ठ नेते मंडळींनी  कविता अशोक बनसोडे-मोरे यांना चेअरमन तर मदिना रियाज तांबोळी यांना व्हा. चेअरमनपदी कायम ठेवत पतसंस्थेच्या महिला सभासदांचा सन्मान केला.

  यासंदर्भाने अनेक महिला भगिनींनी संचालक मंडळ, गुरुसेवा शिक्षक परिवाराचे कौतुक करुन अभिनंदन केले. यावेळी सुकाणु मंडळाचे जेष्ठ सदस्य, सर्व माजी चेअरमन, व्हा. चेअरमन, जिल्ह्याचे माजी चेअरमन विठ्ठलराव काळे, व्हा. चेअरमन संभाजीराव फुले, मावळते चेअरमन विठ्ठलराव नष्टे, संचालक मंडळ उपस्थित होते.

  यावेळी विठ्ठलराव काळे, विठ्ठलराव नष्टे, अशोक बनसोडे, चेअरमन कविता बनसोडे-मोरे यांनी मनोगत व्यक्त केले.

  संस्थेचा ऑडिट वर्ग “अ ” असून सभासद संख्या ८४० आहे. या पाच वर्षात संचालक मंडळाने मासिक मिटींग भत्ता न घेता १ लाख ७४ हजार रुपयाच्या भौतिक सुविधा संस्थेत निर्माण केल्या आहेत. तसेच कर्ज मर्यादा १ लाख ८० हजार रुपयांवरुन ६ लाख रुपये केली आहे.

  या सभासदांना लाभांश १५% दिला जातो. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपनिबंधक कार्यालयाचे  डी.पी.राऊत यांनी काम पाहिले.

  कार्यक्रमाचे प्रास्ताविक नितीन बनकर यांनी केले तर आभार हरि खरात यांनी मानले. यावेळी माळशिरस तालुका शिक्षक संघ व गुरुसेवा शिक्षक परिवाराचे बसुसंख्य शिक्षक बांधव कोरोनाचे सोशल डिस्टन्स व सर्व नियम पाळत उपस्थित होते.