धक्कादायक ! जमीन नांगरताना निघाले मानवी सांगाडे

    अकलुज : महाराष्ट्र राज्य शेती महामंडळ श्रीपूर ऊस मळाअंतर्गत जमीन कसायला दिलेल्या शेतकरी जमीन सुपीक व लेव्हल करत असताना पंधरा सेक्शन हद्दीत जमीन नांगर करत असलेल्या त्या जमिनीत मानवी सांगाडे सापडले आहेत. सांगाडे, कवठी, हाडे ठिसूळ झालेल्या अवस्थेत नांगरणी करताना सापडले आहेत. त्यामुळे या परिसरात एकच खळबळ उडाली.

    तीस चाळीस वर्षांपूर्वी या भागात राहणारे लोक मयत व्यक्तींना शेती महामंडळ श्रीपूर ऊस मळाअंतर्गत पडीक जागेत दफन करत असावेत. शेती महामंडळातील कामावर असणारे स्थानिक कामगार या परिसरात राहायला होते. त्याकाळी पक्की स्मशानभूमी नसल्याने व सुमारे पन्नास वर्षांपूर्वी गोरगरीब अशिक्षित मजूर मयत व्यक्तींना पुरत असत. त्यातीलच हे सांगाडे असावेत. माढा तालुक्यातील सापटणे येथील ढवळे पाटील यांनी शेती महामंडळाकडून सुमारे अडीचशे एकर जमीन संयुक्तिक करारांवर एकरी २५ हजार रुपये पुणे येथील हेड ऑफिसमध्ये भरुन जमीन कसायला सुरुवात करण्यासाठी सदर जमीन नांगरत आहेत. त्यावेळी हा प्रकार घडला आहे.

    यावेळी वंचित बहुजन आघाडी श्रीपूर येथील कार्यकर्ते यांनी समक्ष भेट दिली व पाहणी केली. मानवी सांगाडे आहे त्या जमिनीत व्यवस्थित दफन करा, यातील दहा गुंठे जागा स्मशानभूमीसाठी आरक्षित ठेवण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. त्यानंतर शेती महामंडळ श्रीपूर ऊस मळा येथील कर्मचारी भालचंद्र शिंदे सुरक्षारक्षक विलास महाडीक यांनी तुमचे म्हणणे पुणे येथे हेड ऑफिसला कळवा, आम्हाला येथे काही निर्णय घेण्याचे अधिकार नाहीत. हेड ऑफिसचे वरिष्ठ अधिकारी निर्णय घेतील, अशी त्यांनी वंचित बहुजन आघाडीचे शैलेश शेंडगे, संदीप घाडगे, बंटी चंदनशिवे व इतर कार्यकर्त्यांना समजावून सांगितले.

    या परिसरात राहणारे व पूर्वी शेती महामंडळ श्रीपूर ऊस मळ्यात काम करणाऱ्या येथील रहिवाशांना राहण्यासाठी आठ एकर जमीन ही द्यावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केली. पुणे हेड ऑफिस येथून पुढील निर्णय येईपर्यंत या ८ एकर क्षेत्रावर ढवळे पाटील यांनी ताबा घेऊ नये, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली.

    यावेळी श्रीपूर पोलिस चौकीचे पोलिस कर्मचारी धनाजी झगडे, गायकवाड बंदोबस्तास उपस्थित होते. मानवी सांगाडे सापडले याची चर्चा परिसरात झाल्याने बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. कोणताही वाद संघर्ष न होता पोलिस व कार्यकर्ते आणि महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी सदर प्रकरण व्यवस्थित हाताळले. पुढील हेड ऑफिसमधून काय निर्णय व आदेश येतोय याकडे स्थानिक रहिवासी यांचे लक्ष लागले आहे.