नैतिकता आडवी येत असेल तर पालकमंत्री पद नको, पण इंदापूर तालुक्याला सिंचनासाठी पाणी योजना आणणारच : दत्तात्रय भरणे

सोलापूरपेक्षा आपलं इंदापूर आणि मुंबईच बरी आहे. नैतिकता आडवी येत असेल तर पालकमंत्री पद नको पण इंदापूर तालुक्याला सिंचनासाठी पाणी योजना आणणारच असे मत सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी व्यक्त केले.

    कळस : सोलापूर जिल्ह्यातील लोकांनी गैरसमज केल्याने उजनीवरील पाणी योजनेला अडचण आली. मात्र, सोलापूरपेक्षा आपलं इंदापूर आणि मुंबईच बरी आहे. नैतिकता आडवी येत असेल तर पालकमंत्री पद नको पण इंदापूर तालुक्याला सिंचनासाठी पाणी योजना आणणारच असे मत सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी व्यक्त केले. रुई (ता.इंदापूर) येथे पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद सदस्य प्रविण माने, माजी सदस्य प्रतापराव पाटील,नियोजन मंडळाचे सदस्य सचिन सपकळ उपस्थित होते.

    दरम्यान भरणे म्हणाले, उजनीवरील योजनेबाबत सोलापूर जिल्ह्यातील पदाधिकारी व लोकांमध्ये गैरसमज झाला. त्यामुळे अडचण आली. मात्र, नैतिकता असल्याने अडचण होती. आपला इंदापुर तालुका व मुंबईच बरी आहे. सोलापूर जिल्ह्याचा गैरसमज झाल्याने पालकमंत्री महत्वाचे नाही. मला इंदापूर तालुक्यातील पाणी प्रश्न महत्वाचा आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत तालुक्याला पाणी योजना मंजुर करुन ती पूर्ण करणारच आहे. तालुक्यातील विकासासाठी मोठ्या प्रमाणावर निधी दिला असून आगामी काही दिवसांत सुमारे ४०० कोटी रुपये रस्तेविकासासाठी उपलब्ध होणार आहेत. तसेच डिकसळ येथील व निरा नदीवरील दोन पुलांचे बांधकाम करण्यासाठी निधी उपलब्ध करण्यात आला आहे.

    बाबीर देवस्थानच्या विकासासाठी पर्यटन विकास आराखडा मंजूर करण्यात येईल व वनखात्याच्या माध्यमातून सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. तसेच मंदिरासाठी प्रविण माने व माझ्या माध्यमातून ८० लाख रुपये उपलब्ध करून देण्यात येतील असे सांगितले.