“माझ्या मोबाईलमध्ये तुझ्यासोबतचे काढलेले फोटो सोशल मिडीयावर व्हायरल करेन”, असे म्हणत प्रियकराने लुबाडले प्रेयसीला ; अकलूज पोलिसांकडून प्रियकराला अटक

आरोपी पीडितेला वारंवार फोटो वायरल करण्याची धमकी देत ५ महिन्यात सुमारे ६ लाख १० हजार रुपये घेतले. आरोपीने यासाठी मित्राची देखील मदत घेतली. आरोपीने पुन्हा ६ जून २०२१ रोजी दुपारी १२ वा. चे सुमारास पिडीत मुलीच्या वडिलांसमोर जाऊन गोंधळ घातला. सुरेशने पिडीत मुलीचे नाव घेवून मोठयाने आरडा ओरडा केला. सुरेश याचा आवाज ऐकून मुलीच्या वडीलांनी बाहेर येवून त्याला याप्रकाराबद्दल विचारले तेव्हा त्याने, मी तुझ्या मुलीचा प्रियकर आहे, तुझ्या मुलीला बोलव असे सांगितले. जेव्हा पिडीत मुलगी घरातून बाहेर आली तेव्हा त्याने तिचा हात पकडून, " तु मला २ लाख रुपये दे नाहीतर तु माझ्या सोबत चल असे म्हणत पिडीत मुलीशी गैरवर्तन करु लागला.

    अकलूज : प्रेमाचे नाटक केलेल्या प्रियकराने प्रेयसीसोबतचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची धमकी देत ५ महिन्यात सुमारे ६ लाख १० हजार रूपये उकळल्याच्या आरोपावरून तसेच पिडीत मुलीच्या वडिलांना मारहाण केल्याच्या तक्रारीवरून अकलूज पोलिसांनी आरोपी प्रियकराला अटक केली आहे.

    याबाबत पोलिस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी सुरेश नितिन नलवडे रा. उदयनगर, चौडेश्वरवाडी हा त्याच्या मोबाईलवरून पिडीत मुलीला वारंवार फोन, मॅसेज करत होता. जानेवारी २०२१ मध्ये आरोपी सुरेश नितिन नलवडे याने पिडीत मुलीला फोनकरुन सदाशिवराव माने विदयालय या शाळेजवळ बोलावले व तेथून आनंदी गणेश मंदिर येथे घेवून गेला होता. त्याठिकाणी बराचवेळ गप्पा गोष्टी केल्या त्यावेळी त्याने त्याचे मोबाईलमध्ये पिडीत मुलीसोबत फोटो काढले होते. त्यानंतर १५ दिवसांत तो तिला फोन करत होता परंतु पिडीत मुलगी फोन उचलत नव्हती. तरी देखील आरोपी सुरेश नितिन नलवडे हा पिडीत मुलीस वारंवार फोन करत राहिला. मात्र जेव्हा पीडितेने वैतागून एक दिवशी फोन उचलला तेव्हा आरोपीने, “माझ्या मोबाईलमध्ये तुझ्यासोबतचे काढलेले फोटो सोशल मिडीयावर व्हायरल करेन, तुझ्या वडीलांना फोटो दाखवेन, तु मला दिड लाख रुपये दे, नाहीतर तुझे फोटो व्हायरल करेन “, अशी धमकी पिडीतेला दिली. यांनतर घाबरलेल्या पीडितेने घरातील कोणाला काही कळू देता घरातील दिड लाख रुपये त्याला दिले.

    याप्रकारानंतरही आरोपी पीडितेला वारंवार फोटो वायरल करण्याची धमकी देत ५ महिन्यात सुमारे ६ लाख १० हजार रुपये घेतले. आरोपीने यासाठी मित्राची देखील मदत घेतली. आरोपीने पुन्हा ६ जून २०२१ रोजी दुपारी १२ वा. चे सुमारास पिडीत मुलीच्या वडिलांसमोर जाऊन गोंधळ घातला. सुरेशने पिडीत मुलीचे नाव घेवून मोठयाने आरडा ओरडा केला. सुरेश याचा आवाज ऐकून मुलीच्या वडीलांनी बाहेर येवून त्याला याप्रकाराबद्दल विचारले तेव्हा त्याने, मी तुझ्या मुलीचा प्रियकर आहे, तुझ्या मुलीला बोलव असे सांगितले. जेव्हा पिडीत मुलगी घरातून बाहेर आली तेव्हा त्याने तिचा हात पकडून, ” तु मला २ लाख रुपये दे नाहीतर तु माझ्या सोबत चल असे म्हणत पिडीत मुलीशी गैरवर्तन करु लागला. पीडितेच्या वडिलांनी जेव्हा त्याला विरोध केला तेव्हा आरोपी सुरेश नलवडे याने शिवीगाळ, दमदाटी करुन हाताने, लाथाबुक्याने त्यांना मारहाण केली असल्याची तक्रार पिडीत मुलीचे वडिलांनी अकलूज पोलिसांत केली आहे.  त्यांच्या तक्रारीनुसार अकलुज पोलीस ठाण्यात विविध गुन्हयाच्या कलमासोबत लैंगिक अत्याचारापासून बालकाचा संरक्षण अधिनियम कलम १२, ४२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी सुरेश नलवडे यास अटक करण्यात आली आहे.

    सदर गुन्हयाचा तपास पोलीस निरीक्षक अरुण सुगांवकर यांचे मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक एस.आर.शिंदे या करीत आहेत.अकलुज पोलीस स्टेशनचे हद्दीत कोणी इसम नागरीकांना विनाकारण त्रास देत असल्यास अथवा इतर कोणताही प्रकार घडत असल्यास नागरीकांनी अकलुज पोलीस स्टेशनला संपर्क साधावा. त्यांचे नांव गोपनीय ठेवण्यात येईल. संबंधीत आरोपीविरुध्द गुन्हा दाखल करुन कारवाई करण्यात येईल याची नागरीकांनी नोंद घ्यावी.