कोंबडवाडी अनगर येथील हातभट्टी दारूचा अड्डा पोलिसांकडून उद्ध्वस्त

  मोहोळ : कोंबडवाडी अनगर येथील हातभट्टी दारू अड्ड्यावर शनिवार ४ सप्टेंबर रोजी मोहोळ पोलिसांनी छापा टाकून हातभट्टी अड्डा उद्ध्वस्त केला. यावेळी पोलिसांनी विषारी रसायनासह १ लाख ९ हजार सातशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. या प्रकरणी मोहोळ पोलिसात ६ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  याबाबत मोहोळ पोलिस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, मोहोळ तालुक्यातील कोंबडवाडी अनगर येथे मानवी शरीराला धोकादायक असणारी विषारी रसायने वापरून हातभट्टी दारू तयार केली जात असल्याची गोपनीय माहिती मोहोळ पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार शनिवार ४ सप्टेंबर रोजी मोहोळचे पोलीस निरीक्षक अशोक सायकर यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक अशितोष चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक संतोष माने, सुधीर खारगे, सहाय्यक फौजदार बाळासाहेब शेलार, लोभू चव्हाण व अन्य पोलीस कर्मचाऱ्यांच्या पथकाने दुपारी दोन वाजता कोंबडवाडी अनगर येथे छापा टाकला.

  यावेळी ४ महिला व दोन पुरुष आपापल्या घराच्या पाठीमागे बॅरलमध्ये विषारी रसायने वापरून हातभट्टी दारू तयार करीत असल्याचे निदर्शनास आले. यावेळी पोलीस आल्याची चाहूल लागल्याने त्यांनी झाडाझुडपांचा फायदा घेऊन घटनास्थळावरून पलायन केले.

  याप्रसंगी पोलिस पथकाने घटनास्थळावरुन हातभट्टी दारू तयार करण्यासाठी लागणारे तब्बल ३८०० लिटर विषारी रसायन, ८० लिटर आंबट उग्र वासाची हातभट्टी दारू, सहा लोखंडी बॅरल व सहा लोखंडी पाट्या असे एकूण १ लाख ९ हजार ७०० रुपयांचे साहित्य जप्त केले. यावेळी पोलिस पथकाने १८० मिलीच्या १२ बाटल्यांमध्ये विषारी रसायन व हातभट्टी दारूचे नमुने घेऊन उर्वरित मुद्देमाल जागीच नष्ट केला.

  पोलिसांनी अधिक चौकशी केली असता हे दारू अड्डे निलाबाई उर्फ अलका पवार, लता पवार, पूजा पवार, राणी पवार, मच्छिंद्र पवार, बबन पवार यांचे असल्याचे समजले.

  याप्रकरणी पोलीस नाईक प्रवीण साठे यांनी मोहोळ पोलिसात फिर्याद दिली असून वरील सहा जणांच्या विरोधात भादंवि कलम ३२८ अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र सर्वच्या सर्व आरोपी पळून गेल्यामुळे पोलिसांकडून त्यांचा शोध घेतला जात आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक आशुतोष चव्हाण हे करीत आहेत.