शेतकर्‍यांना तत्काळ हेक्टरी एक लाख रुपये नुकसानभरपाई द्या; मुख्यमंत्र्यांकडे मागणी

    अकलूज : सोलापूर जिल्ह्यात गेले आठवडाभर पडत असलेल्या अतिवृष्टीमुळे यंदाची सरासरी ओलांडली आहे. संपूर्ण जिल्ह्यात उच्चांकी पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे नदी, नाल्यांना पूर येऊन हजारो हेक्टर क्षेत्रावरील शेती पिकाला फटका बसला आहे व हजारो शेतकऱ्यांची पिके पाण्यात गेली आहेत. पावसामुळे ओढे-नाले, नद्या तुडूंब भरून वाहत आहेत. यामुळे नदी नाल्याच्या शेजारील जमिनीतील माती मोठ्या प्रमाणात वाहून गेल्याने जमिनीचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

    याबरोबर अनेक शेतकऱ्याची पिके वाहून गेली आहेत. अनेकांच्या फळबागांचेही नुकसान झाले आहे. शेतकर्‍यांचे खरीपातील काढणीला आलेले सोयाबिन, उडीद, मुगाचे नुकसान झाले, तर काहीची तूर, भूईमूग, सूर्यफूल पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील हजारो शेतकर्‍यांच्या लाखो हेक्टर शेती पिकाला फटका बसला आहे. जिल्ह्यातील हजारो हेक्टर जिरायत, बागायत क्षेत्रातील अनेक पिकांना याचा फटका बसला आहे.

    शेतकरी आधीच संकटात असताना या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी आणखीनच संकटात सापडला आहे. त्यामुळे शासनाने कोणताही भेदभाव न करता सर्व नियम अटी शिथिल करून अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या सर्व शेतकर्‍यांना तत्काळ हेक्टरी 1 लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी, अशा मागणीचे निवेदन सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, दत्तात्रय भरणे यांना इमेलद्वारे पाठवले आहे.