बसमध्ये कंडक्टरने गणपतराव देशमुखांशी घातली होती हुज्जत, अन् झालं असं की…

प्रचंड साधी राहणीमान असलेले गणपतराव देशमुख विरळेच. नेहमी एसटीने फिरणाऱ्या गणपतरावांनी कधीच बडेजाव केला नाही. गणपतराव देशमुख अत्यंत साधे होते. मुंबईतील विधानसभेचं अधिवेशन असो की नागपूरचे हिवाळी अधिवेशन ते प्रत्येक अधिवेशनाला एसटीनेच जायचे. २०१७मध्ये झालेल्या नागपूर अधिवेशनालाही ते एसटीनेच आले होते. ते कुठेही जायचे असेल तर एसटीनेच जायचे.

  सोलापूर : सोलापूरमधील सांगोला विधानसभेचे माजी आमदार गणपतराव देशमुख यांचं निधन झालं आहे. सोलापुरातील अश्विनी हॉस्पिटलमध्ये वयाच्या 94 व्या वर्षी उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. गणपतराव देशमुख हे तब्बल 11 वेळा आमदार होते. त्यांना राजकारणाचा दांडगा अनुभव होता. त्यांच्या निधनामुळे राजकीय विश्वावर शोककळा पसरली आहे.

  शनिवारी सकाळी ६.३० वाजता सोलापुरातून त्यांचे पार्थिव पेनूर येथे आणून अर्धा तास तेथे अंत्यदर्शनासाठी ठेवले जाणार आहे. तेथून पंढरपूरमार्गे सांगोला येथे पोहोचेल. सांगोल्यात पंचायत समिती कार्यालयापासून कचेरी रोड, अण्णाभाऊ साठे पुतळा, जयभवानी चौक, नगर परिषदेसमोरून नेहरू चौक, स्टेशन रोडमार्गे आणल्यानंतर त्यांच्या निवासस्थानी पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवले जाणार आहे. यानंतर दुपारी १ वाजता सांगोला सूतगिरणीच्या पाठीमागील प्रांगणात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

  प्रत्येक अधिवेशनाला एसटीनेच जायचे

  प्रचंड साधी राहणीमान असलेले गणपतराव देशमुख विरळेच. नेहमी एसटीने फिरणाऱ्या गणपतरावांनी कधीच बडेजाव केला नाही. गणपतराव देशमुख अत्यंत साधे होते. मुंबईतील विधानसभेचं अधिवेशन असो की नागपूरचे हिवाळी अधिवेशन ते प्रत्येक अधिवेशनाला एसटीनेच जायचे. २०१७मध्ये झालेल्या नागपूर अधिवेशनालाही ते एसटीनेच आले होते. ते कुठेही जायचे असेल तर एसटीनेच जायचे.

  कंडक्टरने तिकीट विचारलं…

  एसटी प्रवासाचा नियम त्यांनी मोडला नाही. तो शिरस्ता त्यांनी कायम ठेवला. एकदा एसटीने प्रवास करत असताना त्यांना कंडक्टरने तिकीट विचारलं. त्यावर मी आमदार आहे, असं गणपतराव म्हणाले. आमदार आणि एसटीतून प्रवास करतोय? यावर कंडक्टरचा विश्वासच बसेना. त्याने गणपतरावांशी हुज्जत घालायला सुरुवात केली. अखेर त्याने डेपोतील अधिकाऱ्यांना बोलावलं. अधिकाऱ्यांनी गणपतरावांना ओळखलं. त्यांची माफी मागितली अन् गणपतरावांचा प्रवास सुकर झाला होता.

  तब्बल ५४ वर्षे सांगोल्याचे प्रतिनिधित्व केले

  विधानसभेवर एकाच मतदारसंघातून सर्वाधिक वेळा निवडून येण्याचा द्रविड मुन्नेत्र कळघमचे नेते एम. करुणानिधी यांचा विक्रम शेतकरी कामगार पक्षाचे आमदार गणपतराव देशमुख यांनी मोडला होता. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यातील सांगोला मतदारसंघातून ११ वेळा त्यांनी विक्रमी विजय मिळविला. २००९च्या निवडणुकीत विजय मिळवून, करुणानिधी यांच्या पाठोपाठ दहाव्यांदा आमदारकीची निवडणूक जिंकणारे देशमुख हे देशातले दुसरे आमदार ठरले होते. साधी राहणी असलेल्या गणपतरावांनी तब्बल ५४ वर्षे सांगोल्याचे प्रतिनिधित्व केले होते.