विठ्ठल कारखान्याच्या अडचणीत वाढ ; बँक खाती सील, आर आर सी अंतर्गत कारवाईचे आदेश

    पंढरपूर : श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची आर्थिक स्थिती अडचणीची असल्याने अनेक संकटे या संस्थेसमोर उभी राहिली आहेत. जीएसटी न भरल्याच्या कारणावरून काही दिवसापूर्वी कारखान्याची बँक खाती सील करण्यात आली आहेत. तर आता साखर आयुक्तांनी, उसाचे गाळप करून शेतकऱ्यांची रक्कम थकवल्याने विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

    साखर आयुक्तांनी १३ सहकारी साखर कारखान्यांवर कारवाई केली असून यातील सात कारखाने हे सोलापूर जिल्ह्यातील आहेत. यामध्ये वेणूनगर येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचा देखील समावेश आहे. या कारखान्याने ऊस गाळपाचे सुमारे ३९ कोटी रुपये थकवले आहेत. गाळप करूनही ऊस उत्पादकांना त्यांच्या हक्काचे पैसे न दिल्यास आर आर सीची कारवाई होते. तहसीलदार यांच्यामार्फत संस्थेची मालमत्ता ताब्यात घेऊन जिल्हाधिकारी कारवाई करतात. चारच दिवसांपूर्वी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची बँक खाती सील करण्यात आली असून पंधरा कोटी रुपयांचा जीएसटी कर त्यांनी भरल्याने ही कारवाई केली होती. कारखान्याने साखर विक्री केली मात्र या साठीची सेवा कर व जीएसटीची रक्कम थकवलेली आहे. याबाबत जीएसटी कार्यालयाने कारखान्यांच्या बँकांना नोटिसा पाठवून कारखान्यांची सर्व खाती तात्पुरती बंद केली आहेत.

    कै. भारत भालके यांचे निधन झाल्यानंतर त्यांचे सुपूत्र भगिरथ भालके यांच्याकडे कारखान्याची सूत्रे आली आहेत. सध्या ते कारखान्याचे अध्यक्ष आहेत. मात्र सध्या विठ्ठल परिवारात फूट पडली असून कारखान्याचे संस्थेचे संस्थापक कै औदुंबरआण्णा पाटील यांचे नातू युवराज पाटील यांनी साखर आयुक्तांकडे गेल्या काही दिवसांपूर्वी तक्रार केली होती. या तक्रारीत त्यांनी सरकारकडे असलेली बँक व शेतकऱ्यांची देणी यासह या हंगामात २० डिसेंबर२०२० नंतर उस वाहतूकदारांची व कामगारांचे पगार यांची थकलेली रक्कम याबाबतची माहिती दिली होती.

    विठ्ठल सहकारी साखर कारखाना पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांचा राजवाडा ओळखला जात होता. मात्र गेल्या काही वर्षापासून विविध कारणांनी या कारखान्याची आर्थिक स्थिती बिघडली आहे. गत हंगामात हा कारखाना सुरू होऊ शकणार नव्हता. तर २० -२१ मध्ये या गाळपाची परवानगी व थकबाकी हमी मिळावी, यासाठी आ. भारत भालके यांनी अनेक प्रयत्न करून हा कारखाना सुरू केला होता. मात्र २०२० मध्ये त्यांचे निधन झाले. यानंतर कारखान्यांच्या अडचणी सर्व बाजूने वाढताना दिसत आहेत. त्यामुळे या पुढील काळात विठ्ठल कारखान्याचे काय होणार, याकडे सभासद व तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.