उजनीची उंची दोन ‌मीटरने‌ वाढवा मगच इंदापूरला ५ टीएमसी पाणी न्या ; माजी आमदार ‌राजन‌ पाटील‌ यांचे स्पष्टीकरण

उजनी धरणातील ५ टीएमसी पाणी इंदापूर भागात नेत असल्याच्या पाश्वभूमीवर माजी आमदार राजन पाटील यांनी या घटनेचा निषेध व्यक्त करीत असल्याचे सांगितले. पुढे त्यांनी सांगितले की सन १९९३ साली मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार धरणाची उंची दोन मीटरने वाढविल्यास पाठीमागील जमिनीला कसलाही धोका न होता आणि कोणत्याही शेतकऱ्यांची जमीन अधिग्रहित न करता १२ टीएमसी पाणी धरणात साठेल.

  मोहोळ: उजनी धरणातील पाणी वाटपाचे यापूर्वीच पूर्ण नियोजन झाले आहे. मात्र इंदापूर भागातील काही गावांना पाणी देण्यासाठी वेगळा मार्ग म्हणून शासनाने पळवाट काढून सोलापूर जिल्ह्याच्या हक्काचे पाच टी.एम.सी पाणी उचलण्याचा घाट घातला जात आहे, हा सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर अन्याय आहे असे सांगत उजनी धरणाची उंची दोन मीटरने वाढवा, मगच पाच टीएमसी पाणी इंदापूरला न्या, असे सूचक वक्तव्य मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांनी केले.

  अनगर( ता .मोहोळ) येथील लोकनेते साखर कारखाना कार्यस्थळावर पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते, पुढे बोलताना राजन पाटील म्हणाले की, उजनी धरणातून पाच टीएमसी पाणी ‘सांडपाणी’ हा खोटा शब्दप्रयोग वापरुन इंदापूरला नेण्याचा आदेश सरकारने काढलेला आहे. पण हे सर्व सांडपाणी दौंडपर्यंतचे शेतकरी उचलतात. त्यामुळे ही निव्वळ दिशाभूल आहे. सोलापूर जिल्ह्यावर हा मोठा अन्याय झालेला आहे, हा अन्याय सहन केला जाणार नाही. या निर्णयाला आमचा तीव्र विरोध राहील. यासाठी प्रसंगी आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही माजी आमदार राजन पाटील यांनी दिला.

  उजनी धरणातील ५ टीएमसी पाणी इंदापूर भागात नेत असल्याच्या पाश्वभूमीवर माजी आमदार राजन पाटील यांनी या घटनेचा निषेध व्यक्त करीत असल्याचे सांगितले. पुढे त्यांनी सांगितले की सन १९९३ साली मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार धरणाची उंची दोन मीटरने वाढविल्यास पाठीमागील जमिनीला कसलाही धोका न होता आणि कोणत्याही शेतकऱ्यांची जमीन अधिग्रहित न करता १२ टीएमसी पाणी धरणात साठेल. यातून पाच टीएमसी पाणी इंदापूरला नेता येईल व राहिलेले ७ टीएमसी पाणी सोलापूर जिल्ह्याला मिळेल. या योजनेसाठी सरकारला जास्त खर्चही करावा लागणार नाही. उजनीच्या पाण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठा त्याग केला आहे. उजनीच्या पाण्यासाठी त्यांच्या जमिनी गेल्या आहेत. याचा विसर राज्य सरकारला पडलेला आहे, असा घरचा आहेरही त्यांनी सरकारला दिला.

  ५ टी एम सी पाणी इंदापूर भागातील गावांना नेण्याच्या या निर्णयामुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर मोठा अन्याय होणार असून सोलापूर जिल्ह्याच्या हक्काचे पाणी आम्ही कदापिही इतरत्र नेऊ देणार नाही, अन्यथा शासनाला याची मोठी किंमत मोजावी लागेल.

  -माजी आ. राजन पाटील, मोहोळ

  “सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजनी जलाशयातील शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी आणि भविष्यामध्ये धरणाची उंची वाढवल्यानंतर मिळणाऱ्या अतिरिक्त १२ टी एम सी पाण्यापैकी ५ टी एम सी पाणी इंदापूर, पुणे जिल्ह्याला किंबहुना बारामतीतील आपल्या नेतृत्वाला खुश करण्यासाठी देण्याचा अधिकार राजन पाटील यांना कुणी दिला?”
  -सोमेश क्षीरसागर , शिवसेना नेते मोहोळ

  “उजनी धरणातील पाच टीएमसी पाणी इंदापूर तालुक्याला वळविण्याच्या चुकीच्या धोरणात्मक निर्णयाबाबतीत पालकमंत्री दत्तात्रय भरणे एकटेच जबाबदार नसून महाविकास आघाडी सरकारमधील सर्व घटकपक्ष यास सर्वस्वी जबाबदार आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारमधील सोलापूर जिल्ह्याच्या सत्ताधाऱ्यांनी अगोदर आपापल्या पक्षाचे राजीनामे द्यावेत आणि मग या प्रकरणी आंदोलन करावे. नाहीतर ‘चोराच्या उलट्या बोंबा’ असा प्रत्यय जनतेला आल्यावाचून राहणार नाही.”
  -संजीव खिलारे, प्रदेश सचिव , भाजपा अनुसूचित जाती मोर्चा.