घाटणे गावातील ग्रामपंचायत सदस्यांसह ग्रामस्थांचे बेमुदत उपोषण

  मोहोळ : मोहोळ तालुक्यातील घाटणे येथे कोरोनाच्या संदर्भाने कोणत्याही उपाययोजना न करता, केवळ प्रसिद्धीचा स्टंट म्हणून सरपंच व ग्रामसेवकांनी गावाची व शासनाची दिशाभूल करून फसवणूक केली आहे. कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांनी स्वतःहून मोहोळ येथे येऊन उपचार घेतले. खोट्या प्रसिद्धीसाठी गावाला वेठीस धरणाऱ्या सरपंचावर व ग्रामसेवकांवर कारवाई करावी, या मागणीसाठी घाटणे गावातील ग्रामपंचायत सदस्यांसह ग्रामस्थांनी पंचायत समिती कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

  घाटणे तालुका मोहोळ येथील ५५ ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोरोनाच्या संदर्भाने गावात फवारणी केली नाही. तसेच सरपंचांनी स्वतःच्याच पार्टीच्या लोकांना मास्क, सॅनिटायझर वाटप केले. इतर कोणालाही लाभ दिला नाही. जे लोक कोरोनाबाधित झाले होते. त्यांनी स्वतःहून मोहोळ येथे उपचार घेत बरे झाले. ग्रामसेवक, सरपंच व इतर कर्मचाऱ्यांनी त्यांच्याकडे लक्ष दिले नाही, अशी परिस्थिती असतानाही सरपंच व ग्रामसेवक गावातील नागरिकांची व शासनाची दिशाभूल करून प्रसिद्धीसाठी गावाला वेठीस धरत आहेत.

  सरपंच व ग्रामसेवक यांच्या खोटे बोलण्यामुळे प्रशासनाचे गावाकडे दुर्लक्ष होत आहे. ग्रामपंचायतीने उभ्या केलेल्या आरओ प्लांट आणि ग्रामपंचायत दुरुस्तीच्या बाबतची माहिती ग्रामपंचायत सदस्य खेलू माने व रेश्मा गायकवाड यांना बघण्यास मिळावी. सरपंच व ग्रामसेवक यांच्यावर कडक कारवाई करावी, या मागण्या करण्यात आल्या आहेत. या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, तहसीलदार यांना देण्यात आल्या आहेत.

  माध्यमांतून खोटी माहिती

  प्रसारमाध्यमातून खोटी माहिती देऊन जवळच्या लोकांना लाभ देण्याचा प्रकार झाला आहे. तपासण्या नाहीत, विलगीकरण कक्ष केल्याचे सरपंच सांगतात, मात्र असे काहीही केले नाही. तीन दिवसांपूर्वी कोरोनामुळे गावातील एकाचा मृत्यू झाला. गाव कोरोनामुक्त म्हणून सांगता मग याची जबाबदारी कोण घेणार? याची सखोल चौकशी व्हावी.

  – बाळासाहेब देशमुख, ग्रामस्थ घाटणे ता. मोहोळ

  राजकारणातून हे सगळे सुरू आहे. निवेदनातील अनेक जणांच्या फसवून सह्या घेतल्या आहेत. व्यक्ती द्वेष असू शकतो. परंतु व्यक्ती द्वेषापोटी गावच्या विकासाला बाधा येऊ नये.

  – ऋतुराज देशमुख, सरपंच घाटणे, ता. मोहोळ

  …म्हणून सुरु केले उपषोण

  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना मुक्तीच्या संकल्पनेत कौतुक केलेल्या मोहोळ तालुक्यातील घाटणे गावच्या सरपंचाच्या विरोधातच गावाची व शासनाची दिशाभूल केल्याचे सांगत ग्रामस्थांनी उपोषण सुरू केले. केवळ प्रसिद्धीचा फार्स आहे, प्रत्यक्षात गावात कृती नाही असा आरोप करत जवळच्याच लोकांना लसीकरण व मास्क, सॅनिटायझर वाटप करून दुजाभाव निर्माण केल्याचे सांगत ग्रामस्थांनी सुरु केलेल्या या उपोषणामुळे एकच खळबळ उडाली आहे.