जिल्हा परिषदेच्या निधी वाटपाची चौकशी करा; जयंत पाटलांचे आदेश

  साेलापूर/शेखर गोतसुर्वे : सोलापूर जिल्हा परिषद लघू पाटबंधारे (लपा) विभागाच्या निधी वाटपाची चौकशी करण्याचे आदेश जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी दिल्याची माहिती जि.प.विरोधी पक्षनेता बळीराम साठे यांनी दिली. पुणे येथे नुकतीचं राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक पार पडली. बैठकीदरम्यान जिल्हा परिषदेच्या लपा निधी वाटपात घोळ असल्याची कैफीयत मांडण्यात आली.

  समप्रमाणात निधी वाटप न करता परस्पर मर्जीतील सदस्यांना ज्यादाचा निधी देण्यात आल्याची ओरड बैठकीत करण्यात आली. यावेळी पालकमंत्री दत्तात्रय भरणे, माजी आमदार दीपक साळुंखे, उत्तम जानकर उपस्थित हाेते. सोलापूर जिल्हा परिषदेस सन २०२०-२१ वर्षासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून लघू पाटबंधारे विभागासाठी ४० कोटी ८६ लाख ६९ हजार ५०० रूपयांपर्यंतचा निधी देण्यात आला होता. यापैकी मार्चअखेर २४ कोटी ८८ लाख ९१ हजार ४९९ रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. तर १५ कोटी ९७ लाख ७८ हजार निधी शिल्लक असल्याची बाब बैठकीत निर्दनास आणण्यात आली. या पार्श्वभूमीवर मंत्री जयंत पाटील यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

  आमदार कल्याणशेट्टींनी मागविली माहिती

  दरम्यान भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी देखील लपाच्या निधी वाटपाची माहीती मागविल्याने लपा विभाग चर्चेत आला आहे. समप्रमाणात निधी वाटप न करता नेमका निधी दिला कोणाला ? याची चौकशी करा आशी मागणी भाजपाकडून हाेत आहे.

  अखर्चीत निधी शासनकडे परत

  अधिकाऱ्यांच्या उदासिन कारभारामूळे लपाचा १ कोटी ४४ लाख १६ हजार ६६३ रुपयांचा सन २०१९ -२० सालातील अखर्चीत निधी शासनकडे परत करण्याची नामुष्की आली आहे.