सोलापूरला लसीचा अपुरा पुरवठा ; डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील यांची तक्रार

सोलापूर जिल्ह्यामध्ये कोविड विषाणुचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. असे असताना सोलापूर शहर व सोलापूर ग्रामीणमध्ये त्या प्रमाणात लसीकरण होत नाही. वास्तविक संपूर्ण महाराष्ट्रात सुमारे ३ कोटी २५ लाखापेक्षा जास्त लोकांचे लसीकरण झाले आहे परंतु बाकी जिल्ह्याच्या तुलनेत सोलापूर जिल्ह्यात फक्त ५ लाख ९० हजार लसीकरण झाले आहे.

    अकलूज : लोकसंख्या व संसर्गदर पाहता इतर जिल्हे सोलापूर पेक्षा कमी असताना इतर जिल्ह्यात सोलापूर जिल्ह्यापेक्षा अनेक पटीने लसी दिलेल्या आहेत. सोलापूर जिल्ह्यात योग्य प्रमाणात लसीकरण करावे, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील यांनी इमेलद्वारे केली आहे.

    ५ लाख ९० हजार लसीकरण
    या निवेदनात पुढे असे म्हटले आहे की, सोलापूर जिल्ह्यामध्ये कोविड विषाणुचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. असे असताना सोलापूर शहर व सोलापूर ग्रामीणमध्ये त्या प्रमाणात लसीकरण होत नाही. वास्तविक संपूर्ण महाराष्ट्रात सुमारे ३ कोटी २५ लाखापेक्षा जास्त लोकांचे लसीकरण झाले आहे परंतु बाकी जिल्ह्याच्या तुलनेत सोलापूर जिल्ह्यात फक्त ५ लाख ९० हजार लसीकरण झाले आहे. सोलापूर जिल्ह्यास सुरुवातीपासून फार कमी लसी देऊन जिल्ह्यातील जनतेवर मोठा अन्याय केला जात आहे.

    जाणूनबुजून जिल्ह्याला कमी लशी
    जिल्ह्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणात लशी उपलब्ध करणे गरजेचे असताना जाणूनबुजून सोलापूर जिल्ह्याला कमी लशी मिळाल्याने पश्चिम महाराष्ट्रात सोलापूर जिल्ह्यात सर्वात कमी लसीकरण झाले आहे. पहिल्या डोसचे कालावधी पूर्ण झालेले नागरिक दुसरा डोस घेण्यासाठी प्रतिक्षेत आहेत. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार,महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले, आरोग्य मंत्री राजेश टोपे, पालकमंत्री दत्तात्रय भरणे, आरोग्य राज्य मंत्री राजेश पाटील यड्रावकर, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांना िनवेदन दिले आहे.