दोन शिवसैनिकांच्या हत्येचा तपास सीआयडीकडे वर्ग करावा : नागेश वनकळसे

    मोहोळ / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : मोहोळ येथील शिवसैनिकांच्या खून प्रकरणात अनेक गोष्टी समोर येणार असून, यामध्ये बोगस मतदान नोंदणी, रमाई घरकुल फाईल गहाळ प्रकरण याबरोबर शहरातील एका मंगल कार्यालयाच्या जागेचे खरेदी प्रकरणही कारणीभूत आहेत. घटना घडून आठवडाभराचा कालावधी गेल्यानंतरही पोलीस यंत्रणेचा तपास समाधानकारक नाही. दोन खून प्रकरणाचा तपास सीआयडीकडे वर्ग करावा, अशी मागणी मोहोळ शिवसेनेचे नागेश वनकळसे यांनी पत्रकार परिषदेत केली.

    १४ जुलै रोजी राजकीय वैमनस्यातून मोहोळ येथील सतीश क्षीरसागर व विजय सरवदे या दोन शिवसैनिकांच्या अंगावर टेम्पो घालून खून केल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते रोहित उर्फ अण्णा फडतरे, संतोष सुरवसे, पिंटू सुरवसे, चालक भैय्या असवले अशा चार जणांवर मोहोळ पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. चालक आसवले याला अटक करण्यात आली आहे.

    दरम्यान, घटना घडून आठवडा उलटून गेल्यानंतरही या प्रकरणातील मुख्य तीन आरोपींना पोलिसांनी अटक केलेली नाही. त्यामुळे नातेवाईक, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे. या अनुषंगाने शिवसेनेच्या वतीने मृत शिवसैनिकांच्या नातेवाईकांसह पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.

    यावेळी युवा सेना जिल्हाप्रमुख महेश देशमुख, माजी नगरसेवक महादेव गोडसे, विद्यार्थी सेना जिल्हाप्रमुख हर्षल देशमुख, अशोक गायकवाड, विकास बनसोडे, राहुल क्षीरसागर, बाळू क्षीरसागर, अविनाश क्षीरसागर, किशोर क्षीरसागर, ईश्वर कांबळे, प्रेम कांबळे, विश्वास कांबळे, गणेश क्षीरसागर, विजय माळी, गणेश क्षीरसागर, गणेश उघडे, आकाश क्षीरसागर, सोमेश कापूरे आदी उपस्थित होते.

    यावेळी या प्रकरणाबाबत आरोप करताना युवा सेनेचे जिल्हाप्रमुख महेश देशमुख यांनी राष्ट्रवादीच्या या दोन कार्यकर्त्यांनी पक्षाचा व पदाचा गैरवापर करत मोठ्या प्रमाणात माया गोळा केली असून, शहरातील या अनेक गोष्टी वर पडदा टाकण्यासाठी क्षीरसागर व सरवदे या दोन शिवसैनिकांचा खून करण्यात आला. त्या अनुषंगाने योग्य तो तपास व्हावा, अन्यथा गृहराज्यमंत्र्यांना भेटून संबंधित खून प्रकरणाचा तपास सीआयडीकडे देण्याची मागणी करणार आहे. यासह शिवसेनेच्या वतीने पोलीस ठाण्यावर मृतांच्या नातेवाईकांसह मोर्चाचे आयोजन करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.