ओल्या पडद्याने दंडवत आंदोलन करू; जनहित शेतकरी संघटनेचा इशारा

    मोहोळ : गेल्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमध्ये फळबागांचे व पिकांचे नुकसान झालेल्या पेनूर, पाटकूल, खंडाळी, पापरी व हिवरे यासह इतर राहिलेल्या गावातील शेतकऱ्यांची नुकसान भरपाई तात्काळ जमा करावी. तसेच दोन वर्षांपूर्वी अवकाळी पावसामध्ये कोन्हेरी येथील ५८ शेतकऱ्यांची झालेली नुकसानभरपाईही अद्याप दिली नाही, ती देखील त्वरित जमा करावी, अन्यथा १४ जून रोजी नागनाथ मंदिरापासून मोहोळ तहसील कार्यालयासमोर ओल्या पडद्याने दंडवत आंदोलन करणार असल्याचा इशारा महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

    प्रभाकर देशमुख यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमध्ये फळबागांचे व पिकांचे नुकसान झालेल्या पेनूर, पाटकूल, खंडाळी, पापरी व हिवरे यासह इतर राहिलेल्या गावातील शेतकऱ्यांची नुकसानभरपाई
    तात्काळ जमा करावी. तसेच कोन्हेरी येथील गेल्या दोन वर्षापूर्वीच्या ५८ शेतकऱ्यांची नुकसानभरपाई अद्याप दिली गेली नाही. कोरोनाच्या महामारीमध्ये शेतकरी अडचणीमध्ये असताना शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाईचे पैसे जमा करून प्रशासनाने शेतकऱ्यांना सहकार्य करावे. अन्यथा १४ जून रोजी नागनाथ मंदिर ते मोहोळ तहसील कार्यालयासमोर ओल्या पडद्याने दंडवत आंदोलन करणार असल्याचा इशारा प्रभाकर भैया देशमुख यांनी दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.

    यावेळी जिल्हाध्यक्ष नानासाहेब मोरे, विकास जाधव चंदू निकम, कुमार गोडसे, रणजीत चवरे, नितीन जरग, दत्तात्रय कदम, हनुमंत भोसले, गणेश भोसले, खंडाळी ग्रा प सदस्य तानाजी मुळे, उत्तम दादा मुळे, हरीभाऊ लोंढे आदी उपस्थित होते.