कंचेश्वर साखर कारखाना शेतकऱ्यांच्या खंबीरपणे पाठीशी : दिलीप माने

    सोलापूर : कृषिप्रधान देश म्हणून भारताची ओळख संपूर्ण जगभरात आहे. विविध प्रयोग आणि स्वतःच्या मनगटाच्या जोरावर शेतकऱ्यांनी देशाचे नाव उज्ज्वल केले आहे. शेतकऱ्यांच्या अथक परिश्रमामुळेच भारताची अर्थव्यवस्था मजबूत होत आहे. तसेच कंचेश्वर साखर कारखाना नेहमीच ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत मोलाची साथ देण्याचा प्रयत्न करत आहे, असे माजी आमदार दिलीप माने यांनी सांगितले.

    मंगरुळ (ता. तुळजापूर) येथील कंचेश्वर साखर कारखान्याच्या नूतन पर्यावरणपूरक झिरो वेस्ट डिस्चार्ज
    आसवानी प्रकल्पाकडील बॉयलरचे प्रथम बॉयलर अग्निप्रदीपन सोहळा रविवारी (दि.६) पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाबुराव चव्हाण, एस. एस. इंजिनिरिंगचे (पुणे) संस्थापक भड, कारखान्याचे चेअरमन धनंजय भोसले, व्हाईस चेअरमन पृथ्वीराज माने, मुख्य कार्यकारी अधिकारी संजीवकुमार जाधव, मॅनेजर संजय गारुडकर, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष धर्यशील पाटील, जिल्हा परिषद सदस्य महेंद्र धुरगुडे, जि.प सदस्य दिपक जवळगे, माजी सभापती मुकुंद डोंगरे, मंगरूळचे सरपंच महेश डोंगरे, उपसरपंच गिरीश डोंगरे, सतीश खोपडे, राजेंद्र भोकरे, प्रतापसिह सरडे, अजिंक्य सरडे, बालिश डोंगरे, सतीश जाधव, प्रगतशील उदयोजक शरद दाताळ आदी उपस्थित होते.

    माने म्हणाले, अलीकडील काळात साखरेच्या जागतिक बाजारात सातत्याने दरात चढ-उतार होत आहे. त्यामुळे साखरेवरील उत्पादन खर्च जास्त आणि उत्पन्न कमी अशी अवस्था झाल्यामुळे कारखानदारी अडचणीत सापडत आहे. तरीदेखील कंचेश्वर साखर कारखान्याने शेतकऱ्यांची प्रामाणिक राहण्याची परंपरा जोपासली आहे.

    गेल्या दहा वर्षात तुळजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी कंचेश्वर साखर कारखान्याला मोठी मदत केली आहे. त्याच मदतीचे ऋण फेडण्यासाठी कंचेश्वर साखर कारखाना नेहमीच शेतकऱ्यांच्या विकासासाठी कटिबद्ध राहील.