पोलीस वसाहतीतच सुधारणांचा अभाव; भाजप किसान मोर्चाकडून हलगीनाद आंदोलन

  पंढरपूर : पंढरपूर येथील पोलीस वसाहतीमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून मूलभूत सुविधा मिळत नसल्याने प्रत्येकवेळी तेथील पोलिसांच्या पत्नीसह पोलिसांनी निवेदने देऊन मूलभूत सुविधा देण्याची मागणी केली. मात्र, प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने अखेर भाजप किसान मोर्चाच्या वतीने आंदोलन करण्यात आले.

  बांधकाम विभागाच्या आवारामध्ये आंदोलनकर्ते आंदोलनासाठी बसले असतानाच हालग्याच्या निनादाने परिसर दणाणून गेला आणि आत बसलेले अधिकाऱ्यांना अखेर जाग आली. पंढरपूर शहर पोलीस व ताई वसाहतीची अत्यंत वाईट अवस्था असून तेथे अस्वच्छतेचे साम्राज्य आहे. याबाबत प्रशासनास जागे करण्यासाठी भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश सचिव माऊली हळणवर यांच्या नेतृत्वाखाली सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालयासमोर हलगीनाद आंदोलन करण्यात आले.

  पंढरपूर येथील पोलिस वसाहतीमधील पोलिसांच्या निवासस्थानाची अवस्था अत्यंत वाईट झालेली आहे. गटारी तुंबलेल्या आहेत, छतावरची कवले फुटलेले आहेत, दरवाजे खिडक्या यांची अवस्था अत्यंत नादुरुस्त झालेली आहे, झाडेझुडपे वाढलेली आहेत, गेल्या अनेक वर्षांपासून सार्वजनिक बांधकाम विभाग या देखभाल दुरुस्तीकडे कुठले लक्ष देत नाही. अनेक ठिकाणच्या कार्यालयाची व मंत्र्याच्या दौऱ्यावेळी रस्त्याच्या दुरुस्त्या अधिकाऱ्यांच्या जवळच्या ठेकेदाराना वेळोवेळी कामे दिली जातात.

  कोरोनाच्या काळात प्रचंड काम करणाऱ्या पोलिसांच्या कुटुंबीयांकडे कोणीही लक्ष देत नाही. याठिकाणी झाडेझुडपे वाढलेले आहेत. जप्त केलेली वाहने या ठिकाणी लावले लावल्यामुळे घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे. प्रशासनातील इतर विभागातील कर्मचारी कोरोनाच्या काळामध्ये शासनाच्या पगारी घरी बसून घेत असताना २४ तास काम करणाऱ्या पोलिसांची ही अवस्था होत असेल तर सर्वसामान्य नागरिकांची अवस्था काय असेल या विषयाकडे सरकारने गंभीरतेने पाहावं यासाठी शासनाला जाग आणण्यासाठी हलगी नाद आंदोलन करण्यात आले.

  दोन दिवसांच्या आत कामाला सुरुवात झाली नाही तर सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता गावडे यांच्या कार्यालयात उग्र स्वरुपाचे आंदोलन केले जाईल, असा इशारा यावेळी बोलताना माऊली भाऊ हळणवर यांनी दिला.

  यावेळी भाजप किसान मोर्चाचे प्रदेश सचिव माऊली भाऊ हळणवर, जिल्हाध्यक्ष लक्ष्मण धनवडे, जिल्हा उपाध्यक्ष सुभाष मस्के, न.पा बांधकाम समितीचे सभापती विक्रम शिरसट, रयत क्रांती संघटनेचे दिपक भोसले उपस्थित होते. बांधकाम विभागाचे उप अभियंता एस. व्ही गुंड यांनी पोलिस वसाहतीतील दुरुस्तीची कामे दोन दिवसात सुरू करणार असल्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर हे हलगीनाद आंदोलन मागे घेण्यात आले.