निघृण हत्याकांडातील तिघांना जन्मठेप ; एका आरोपीला ५ वर्ष शिक्षा

शहनाजला त्यांनी रिक्षातून अक्कलकोट सरकारी दवाखान्यासमोरील मोकळ्या मैदानात आणले. त्या ठिकाणी आल्यानंतर शाहीनने तिचे दोन्ही पाय तर अम्माने दोन्ही हात पकडले आणि रमजानने एक्सा ब्लेडने शहनाजचे मुंडके धडावेगळे केले.

    सोलापूर :मुलाच्या व शेजारी राहणाऱ्या तरुणीच्या मदतीने सासूने सुनेचा निर्घृणपणे खून करणाऱ्या तिघा आरोपीना जन्मठेप तर एका आरोपीला पाच वर्षाची शिक्षा सोलापूर जिल्हा न्यायालयाने ठोठवली आहे.
    याबाबत मिळालेली माहीती अशी, अक्कलकोट येथील घाडगे दूध डेअरीसमोरील संजय नगर झोपडपट्टीतील रमजान मन्नू शेखचा विवाह शहनाज हिच्याशी झाला होता. त्यांना एक मुलगी झाली होती. मात्र, रमजान, त्याची आई अम्मा ऊर्फ रेणुका मन्नू शेख, शेजारीण शाहीन रहिमान शेख यांनी पाच वर्षांच्या चिमुकलीला जीवे ठार मारून त्या परिसरातील विकास हॉटेलजवळ टाकून दिले. त्यावरून त्यांच्या घरात वारंवार भांडणे सुरू झाली. या भांडणातून रमजान, अम्मा व शाहीन या तिघांनी २ ऑगस्ट २०१८ रोजी शहनाजला जबर मारहाण केली. त्यात शहनाज जखमी होऊन बेशुद्ध पडली. मारहाणीत शहनाजचा मृत्यू झाला आणि त्यांनी शेजारील रिक्षावाला दिलदार तकदीरखा सौदागरला बोलावून आणले.
    मृत शहनाजला त्यांनी रिक्षातून अक्कलकोट सरकारी दवाखान्यासमोरील मोकळ्या मैदानात आणले. त्या ठिकाणी आल्यानंतर शाहीनने तिचे दोन्ही पाय तर अम्माने दोन्ही हात पकडले आणि रमजानने एक्सा ब्लेडने शहनाजचे मुंडके धडावेगळे केले. त्यानंतर त्यांनी शहनाजचा मृतदेह पोत्यात भरून रमजानच्या दुचाकीवर ठेवला आणि शाहीनच्या मदतीने त्यांनी तोळणूर येथील रेल्वे रुळ गाठला.
    रेल्वे अपघात दाखविण्यासाठी त्यांनी खटाटोप केला, परंतु पोलिस तपासात सत्य समोर आले. रेल्वे गेटमन म्हाळप्पा ढोणे यांनी मृताची खबर अक्कलकोट दक्षिण पोलिस ठाण्यास कळविली. त्यानंतर सरकारतर्फे पोलिस हवालदार धनसिंग राठोड यांनी पोलिसांत फिर्याद दिली. पोलिसांनी कसून तपास केला आणि न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या प्रकरणात 17 साक्षीदार तपासण्यात आले. वैद्यकीय पुरावे, परिस्थितीजन्य पुरावा, आरोपींची कबुली, यावर सरकारतर्फे ऍड. प्रदीपसिंग राजपूत यांनी न्यायालयात युक्तिवाद केला. तो ग्राह्य धरून न्यायालयाने चौघांना दोषी धरले आहे.  या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक व्ही. एस. जाधव यांनी केला तर कोर्टपैरवी म्हणून पोलिस हवालदार डी. कोळी यांची मदत झाली.