पंढरपूर बस स्थानकातून सुरू होणार आता लांब पल्ल्याच्या गाड्या

    पंढरपूर : कोरोना महामारीच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्य सरकारने काही निर्बंध घातले होते. त्यानुसार एसटी बससेवा पूर्णत: बंद होती. त्यात पंढरपूर आगारातून सर्व एसटी बसेस सोलापूर जिल्ह्यासह लांब पल्ल्याच्या जाणाऱ्या बसेस बंद करण्यात आल्या होत्या. त्यानंतर आता निर्बंधांमध्ये शिथिलता आणली जात आहे. त्यामुळे शुक्रवारपासून (दि.१८) पंढरपूर आगारातून लांब पल्ल्याच्या बसेस सुरू करण्यात येत असल्याची माहिती आगार व्यवस्थापक रत्नाकर लाड यांनी दिली.

    पंढरपूर हे तीर्थक्षेत्र असून, या ठिकाणाहून अनेक महत्त्वाच्या शहरात जाणाऱ्या एसटी बसेस कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद करण्यात आल्या होत्या. परंतु आता कोरोना रुग्णसंख्येत घट आल्याने सोलापूर जिल्ह्यासह लांब पल्ल्याच्या एसटी बसेस सुरू करण्यात आले आहे. यामध्ये पंढरपूर बस स्थानकातून पुणे, मुंबई, औरंगाबाद, शिर्डी, अहमदनगर, लातूर, बीड, मेहकर, नाशिक, निजामबाद, गुहागर, अक्कलकोटसह सोलापूर जिल्ह्यातील विविध शहरात या बसेस आजपासून मार्गक्रमण होणार आहेत.

    प्रवाशांनी एसटी बसमधून प्रवास करताना शासनाने दिलेल्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करत स्वतःजवळ सॅनिटायझर व मास्क बांधणे बंधनकारक आहे. मास्क नसेल तर एसटी बसमध्ये प्रवेश नाकारण्यात येणार असल्याने प्रत्येक प्रवाशांनी मास्क लावणे बंधनकारक असल्याचे यावेळी आगार व्यवस्थापकांनी सांगितले.