माढा वैराग-तुळजापूर मार्गाची चाळण; वाहनचालक संतप्त

  माढा : माढा वैराग मार्गाची प्रचंड दुरावस्था झाली असून, वाहनचालक तर या रस्त्याला प्रचंड वैतागले आहेत. ९ ऑक्टोबर रोजी
  नवरात्रोत्सवाची सुरुवात होत आहे. हजारो भाविक याच मार्गावरुन पायी चालत तुळजाभवानी मातेची ज्योत आणायला जातात. त्यामुळे नवरात्रोत्सवाच्या अगोदर तरी किमान या मार्गाची दुरुस्ती हाती घेण्याचे धारिष्ट सार्वजनिक बांधकाम विभागाने दाखवणे गरजेचे आहे.

  माढ्यासह पंढरपूर मंगळवेढा भागातील भक्तगण याच मार्गाने पुढे तुळजापूरला जातात. त्याची यंदाची वाट आणी प्रवास तरी सुखकारक होण्याची भाबडी अपेक्षा ते बाळगुन आहेत. वैरागकडे जाणारा रस्ता तर माढ्यात पुर्ण उखडला गेला आहे. त्यामुळे खडतर मार्गातून प्रवास करीत वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन जावे लागत आहे. माढ्यातील माजी ग्रामपंचायत सदस्य हनुमंत राऊत यांच्या तर माढ्यातील खड्यामुळे गाडीचे चार वेळा नुकसान झाले असून, ७ हजारांचा खर्च यासाठी झाला. याची तक्रार देखील ते सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे करणार आहेत.

  माढा शहरातून वैरागकडे जाणारा हा रस्ता उखडला गेला असुन रस्त्यावरील डांबर निघुन गेल्याने ठीक ठिकाणी ४ ते ५ फुटा पर्यतचे खड्डे निर्माण झालेत. या खड्यात पाणी साठत असल्याने तळ्याचे स्वरुप आले आहे. माढा नगरपंचायत कार्यालय ते मातोश्री गोदावरी आश्रमशाळेपर्यतचा रस्त्याची दुरावस्था झाली आहे. महावितरण कार्यालयाच्या समोर ८ ते १० फुटाचा खड्डा पडला आहे.

  वैरागकडे जोडणारा हा मार्ग उंदरगाव, केवड, जामगाव, मालवंडी गावच्या भागात देखील रस्ता खराब झाला आहे. माझ्या गाडीची नुकसान भरपाई बांधकाम विभागाने द्यावी अन्यथा मी संबधित ठेकेदार व बांधकाम विभागाच्या विरोधात आवाज उठवणार असल्याचे हनुमंत राऊत यांनी सांगितले. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्यानी याकडे केवळ बघ्याची भुमिका न घेता रस्ता दुरुस्तीला प्राधान्य देणे गरजेचे आहे.

  वाहनांची मोठी वर्दळ-माढा, कुर्डूवाडी, टेभुर्णी, पंढरपुर, मोडनिंब भागातील प्रवासी वैराग व तुळजापूरला जाण्यासाठी याच मार्गाने माढ्यावरुन पुढे जातात. त्यामुळे दुचाकी व चारचाकी वाहनाची मोठी वर्दळ या मार्गावरुन दररोज सुरु असते.

  माढा वैराग, तुळजापूर रस्ता मंजूर करावा; ऍड. कन्हेरेची मागणी

  प्रलंबित राहिलेला माढा वैराग तुळजापूर हा मार्ग मंजुर करुन तात्काळ सुरु करावा.हा मार्ग पुर्ण झाल्यास रस्त्याचे भोग संपुन वाहनधारकांची गैरसोय टळेल अशी लेखी मागणी काॅग्रेसचे विधी व न्याय विभागाचे सोलापुर जिल्हा समन्वयक अॅड.सागर कन्हेरे यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे करण्यात आली आहे.

  सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्यानी या मार्गावरुन प्रवास करावा म्हणजे सर्वसामान्य वाहनधारकांची व्यथा समजेल. येत्या ३ दिवसांत रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घ्यावे. अन्यथा प्रवाशांसमवेत खड्यात वृक्षारोपण करुन बांधकाम खात्याचा निषेध करणार आहे.

  – नाना साठे, माढा शहर अध्यक्ष काँग्रेस (आय)

  माढा ते वैराग मार्गावर ठिकठिकाणी खड्डे निर्माण झालेत. त्यामुळे सगळेच खड्डे भरणे योग्यरित्या भरणे शक्य होणार नाही. यासाठी एस.आर.प्रोग्राम अंतर्गत सलग मोठा पॅच मारुन दुरुस्ती करणे शक्य आहे. एस.आर.प्रोग्राममधून या कामाला मंजुरी मिळाल्यास दुरुस्ती हाती घेऊ. तसेच हा माढा वैराग मार्ग नव्याने करण्याचा प्रस्ताव देखील शासनापुढे सादर केला आहे.

  – एन. ए. नाईकवाडी, सहाय्यक अभियंता सा. बा. उपविभाग कुर्डूवाडी