“माझ्या महाराष्ट्राला आरोग्य संपन्नता लाभू दे” मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं विठुरायाकडे साकडं

“मी भाग्यवान आहे की मला इतक्या जवळून महापूजेचा बहुमान मिळाला. लाखो भाविक कळसाचे दर्शन घेऊन परतत आहेत. मी मोठं काहीही केलेले नाही. तुडुंब पंढरपूर, आनंदाची उधळण असते, ते वातावरण आम्हाला सर्वांना हवंय. लवकरात लवकर ते वातावरण आपल्याला मिळावे, अशी मी विठुराया चरणी प्रार्थना करतो,” असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

    आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात विठ्ठल-रुक्मिणी यांची शासकीय महापूजा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते संपन्न झाली. यावेळी “पंढरपुरात पुन्हा एकदा भक्तीसागर भरु दे. भक्तीरसात, टाळ-मृदंगाच्या गजरात तुझ्या ओढीची पायी वारी पुन्हा एकदा सुरु होऊ दे. यासाठी देवा आता कोरोनाचे संकट नष्ट होऊ दे. माझ्या महाराष्ट्राला आरोग्य संपन्नता लाभू दे” असे साकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज आषाढी एकादशीच्या महापुजेच्यावेळी पांडुरंगाच्या चरणी घातले.

    विठुमाऊलीच्या जयघोषात मंदिराचा गाभारा दुमदुमून गेला. पहाटे 3 वाजून 40 मिनिटांनी विठ्ठल-रखुमाई यांची शासकीय महापूजा सपंन्न  झाली. यंदा मानाचे वारकरी म्हणून कोलते दाप्त्यांना मान मिळाला. त्यांनी आज पहाटे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत विठ्ठलाची महापूजा केली.

    “मी भाग्यवान आहे की मला इतक्या जवळून महापूजेचा बहुमान मिळाला. लाखो भाविक कळसाचे दर्शन घेऊन परतत आहेत. मी मोठं काहीही केलेले नाही. तुडुंब पंढरपूर, आनंदाची उधळण असते, ते वातावरण आम्हाला सर्वांना हवंय. लवकरात लवकर ते वातावरण आपल्याला मिळावे, अशी मी विठुराया चरणी प्रार्थना करतो,” असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

    तब्बल दोन तास सुरू असलेल्या या सोहळ्याला पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे आणि सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे देखील उपस्थित होते.