महाराष्ट्रातील दूध संघाकडून सर्वाधिक दूधपुरवठा आंध्र, तामिळनाडू राज्यांना ; सर्वाधिक दर मिळत असल्याने वाढतोय पुरवठा

खासगी मालकी झालेल्या दुधाचे दर कधी वाढवतील व वाढलेला दर कधी अन् किती खाली आणतील याचा भरवसा राहिला नाही.यामुळे शेतकऱ्यांनी गोधन कमी केले आहे. याचा फटका दूध संकलनावर होत आहे.

    सोलापूर: गाईच्या दूध खरेदी दरात वरचेवर वाढ होत असताना महाराष्ट्रातील दूध संघापेक्षा आंध्र प्रदेश व तामिळनाडूचे संघ अधिक दर देत आहेत. सर्वच खासगी दूध संघाचा दूध खरेदी दर प्रति लिटर ३० रुपयापेक्षा अधिक झाला असला तरी यापेक्षा अधिक दर मिळत असल्याने इतर राज्यातील संघाला दूध पुरवठा वाढत आहे.

    खासगी मालकी झालेल्या दुधाचे दर कधी वाढवतील व वाढलेला दर कधी अन् किती खाली आणतील याचा भरवसा राहिला नाही.यामुळे शेतकऱ्यांनी गोधन कमी केले आहे. याचा फटका दूध संकलनावर होत आहे. त्यामुळे दूध दरात मागील तीन महिन्यापासून वाढ होत आहे. महाराष्ट्रातील खासगी दूध उत्पादक संघ सध्या प्रति लिटर २९ -३० रुपयाने दुधाची खरेदी आहेत. मात्र, आंध्रप्रदेश व तामिळनाडूचे खासगी दूध संघ त्यापेक्षा अधिक दर देत आहेत. तामिळनाडूची तिरुमला व हॅटसन डेअरी थेट शेतकऱ्यांना ३१ रुपये व त्यापेक्षा अधिक दर देत आहेत. दुधाचे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर ऑनलाईन जमा करणाऱ्या आंध्र प्रदेशच्या डोटला डेअरीचा दर प्रति लिटर ३३ ते ३५ रुपयापर्यंत मिळत आहे. मात्र महाराष्ट्रातील दूध संस्था यापेक्षा कमी दर देत आहेत. यामुळे जिल्ह्यातून आंध्र प्रदेश व तामिळनाडूच्या दूध संघाच्या संकलनात वाढ होत असल्याचे सांगण्यात आले.