महाविकास आघाडी सरकार बरखास्त करावे; प्रकाश आंबेडकरांची राज्यपालांकडे मागणी

मनसुख हिरेन प्रकरण असो वा देशमुख प्रकरण याची निष्पक्ष चौकशी राज्य सरकारकडून होणार नाही, त्यासाठी हे सरकार राज्यघटनेच्या ३५६व्या कलमान्वये बरखास्त करण्यात यावे, मात्र सभागृह बरखास्त करू नये, अशी मागणी आंबेडकरांनी निवेदनाद्वारे केली आहे. 

    राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझेला मुंबईतून दर महिन्याला १०० कोटी रुपये खंडणी जमा करून देण्याचे आदेश दिले होते. असा गंभीर आरोप परमबीर सिंग यांनी केला आहे. यानंतर राज्याच्या राजकारणात अनेक आरोप प्रत्यारोप होत आहे. विरोधक महाविकास आघाडी सरकारवर आक्रमक झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. यांचं पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी राज्यपालांची भेट घेऊन निवेदन दिले.

    यावेळी माध्यमांशी बोलताना आंबेडकर म्हणाले की, गेल्या काही महिन्यात चार महत्वाच्या लोकांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. त्यानंतर राज्यात शासन आणि प्रशासनातील गुन्हेगारी प्रवृत्तीनी राज्य वेठीस धरल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे

    गृहमंत्री अनिल देशमुखांच्या प्रकरणात राज्यपालांनी आपला अहवाल राष्ट्रपतींना पाठवला नाही तर मी असे समजेल की राज्यपाल ज्या पक्षाचे आहेत तो पक्ष ही या प्रकरणात सामील आहे, असे गंभीर वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केले. हे सरकार बरखास्त करावे अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

     मृत्यू प्रकरणात योग्य चौकशी नाही

    राज्यात गेल्या काही महिन्यात हाय प्रोफाईल लोकांचे मृत्यू झाले असून या सर्व आत्महत्या दाखवण्यात आल्या आहेत. या मृत्यू प्रकरणातही योग्य ती चौकशी झाली नाही, असे असतानाच वाझे प्रकरण बाहेर आले. या प्रकरणातही कोट्यवधी रुपये वसुलीचा आरोप गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर करण्यात आला. आरोप करणारे माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर असून कोट्यावधी रुपये वसूल करण्याचा निर्णय पक्ष स्तरावर घेण्यात आला आहे की कॅबिनेट स्तरावर याची निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे, असंहा ते बोलत होते.

    यावेळी संजय राऊत यांना टोला लगावताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की मी यापूर्वी ही राऊतांना सल्ला दिला आहे की लिहून बोलत जाऊ नका वाचून बोलत जा. ३५६ वर बाबासाहेब काय म्हणाले ते कधी वापरावे, याचा खुलासा बाबासाहेबांनी केला आहे. राऊत यांनी आता राजकारणातील गुन्हेगारी बद्दल बोलावे. मागे हे मी सांगितले होते की मुख्यमंत्र्यांनी कणा दाखवावा. मात्र त्यांच्याकडे कणा नाही हे त्यांनी पुन्हा एकदा दाखवून दिलं असल्याचेही आंबेडकर शेवटी म्हणाले.