अजित पवारांना प्रमुख करणे म्हणजे मेंढरांनी लांडग्याकडून संरक्षणाची अपेक्षा करण्यासारखं; गोपीचंद पडळकरांची टीका

आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही जोरदार टीका केली. ओबीसींची ताकद आपण जाणताच. हा समाज आपल्याकडे मोठ्या अपेक्षेनं पाहतोय. ओबीसींना पदोन्नतीमध्ये 19 टक्के आरक्षणाचा निर्णय तातडीने घ्यावा, अशी मागणी पडळकर यांनी केलीय.

    पंढरपूर : पदोन्नतीतील आरक्षण रद्द करण्याच्या निर्णयाला तूर्तास स्थगिती देण्यात आली आहे. 19 मे रोजी ठाकरे सरकारनं हा मोठा निर्णय घेतला. दरम्यान, भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

    अजित पवार यांना मागासवर्गीय नोकरी पदोन्नती आरक्षण उपसमितीचे प्रमुख करणे म्हणजे मेंढरांनी लांडग्याकडून संरक्षणाची अपेक्षा करावी, असं होईल, अशा शब्दात पडळकर यांनी अजित पवारांवर पुन्हा एकदा निशाणा साधलाय. महाविकास आघाडी सरकारने आरक्षणाचा सावळा गोंधळ सुरू केला आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत काय झाले यावरून ऊर्जामंत्री नितीन राऊत आणि उप समितीचे अध्यक्ष अजित पवार यांच्यातील विसंवाद समोर आला आहे. त्यामुळे आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून मागणी केली आहे की, नक्की काय झाले हे सांगावे. तसंच ओबीसी समाजाला नोकरीतील पदोन्नती आरक्षण मिळावे यासाठी 2006 मध्ये मंत्रिमंडळ उप समिती गठित झाली होती. या समितीने ओबीसीना पदोन्नतीमध्ये 19 टक्के आरक्षण देण्याची शिफारस केली होती. पण सरकारने अद्याप ती आमलात आणली नसल्याचंही पडळकर याांनी म्हटलं आहे.

    तसेचं आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही जोरदार टीका केली. ओबीसींची ताकद आपण जाणताच. हा समाज आपल्याकडे मोठ्या अपेक्षेनं पाहतोय. ओबीसींना पदोन्नतीमध्ये 19 टक्के आरक्षणाचा निर्णय तातडीने घ्यावा, अशी मागणी पडळकर यांनी केलीय.