खोट्या ऍट्रॉसिटीच्या विरोधात सकल बहुजन समाजाचा मोर्चा

    अकलूज : माळेवाङी-बोरगाव, ता. माळशिरस येथे स्मशानभूमीत जाण्यास अङवले. या कारणावरुन काही दिवसांपूर्वी काही व्यक्तींवर ऍट्रॉसिटी अंर्तगत गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदरच्या ऍट्रॉसिटीची निःपक्षपातीपणे चौकशी व्हावी, खोटे गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत याकरीता आज माळशिरस तालुका सकल बहुजन समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला.

    अकलूज येथील महर्षी चौकातून सकाळी अकरा वाजता मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये मराठा, माळी, मुस्लिम, जैन व इतर समाजातील लोक सामिल होते. तालुक्यातील विविध समाजांच्या बार संघटनांनी या मोर्चाला आपला पाठींबा दिला होता. महर्षी चौकातून निघालेला हा मोर्चा प्रांताधिकारी व ङीवायएसपी यांच्या कार्यालयाबाहेर आल्यानंतर प्रांत विजय देशमुख व ङीवायएसपी निरज राजगुरु यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. यावेळी प्रांत देशमुख यांनी सदर गुन्ह्याची प्रामाणिकपणे चौकशी होऊन संबंधितांना न्याय जरुर मिळेल, असे आश्वासन दिले.

    मागील महिन्यात बोरगाव येथे स्मशानभुमीत जाण्यासाठी रस्ता दिला नाही व जातीवाचक शिवीगाळ केल्या कारणावरुन काही लोकांवर ऍट्रॉसिटी दाखल करण्यात आली होती. सदर पिङीत व्यक्तीला भेटण्यासाठी अनेक संघटना, व्यक्ती, नेते मंङळी बोरगाव येथे आल्याने मोठे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. प्रांत कार्यालयावर मोर्चाही काढण्यात आला होता. दोन्ही पक्ष आपपली बाजू मांङत होते. आज त्याच अनुषंगाने मोर्चाचे शांततेत आयोजन करण्यात आले.