विवाहितेची ६ वर्षांच्या मुलीसह आत्महत्या; होटगी येथील घटना

    भंडारकवठे : दक्षिण सोलापूर तालुक्यातील होटगी येथे नवरा-बायकोमध्ये झालेल्या भांडणाच्या रागातून एका महिलेने आपल्या लहानग्या मुलीसह विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली. गेल्या बुधवारी दुपारी बाराच्या सुमारास मायलेकी या दोघींचाही मृतदेह विहिरीत पाण्यावर तरंगताना दिसून आला. वळसंग पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे. यामुळे होटगी गावावर शोककळा पसरली आहे.

    याबाबतची माहिती अशी की, राचम्मा संतोष पटणे (वय २६) व मुलगी चैत्रा पटणे (वय ६) दोघी (रा. पटणे गल्ली, होटगी, ता. दक्षिण सोलापूर) असे आत्महत्या केलेल्या मायलेकींची नावे आहेत. राचम्मा व तिचा पती संतोष पटणे यांच्यामध्ये भांडण झाले होते. यामुळे ती मंगळवारी सकाळी रागाच्या भरात आपल्या मुलीला घेऊन घरातून निघून गेली होती. नातेवाइकांनी मंगळवारी दिवसभर तिचा व मुलीचा शोध घेतला मात्र ते मिळून आलेली नाहीत.

    बुधवारी फताटेवाडी शिवारातील अशोक चव्हाण यांच्या शेतातील (गट नंबर २४७) मधील विहिरीत दोघींचा मृतदेह पाण्यावर तरंगत असताना दिसून आले. याची माहिती मिळताच वळसंग पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक अतुल भोसले, उपनिरीक्षक पाटील व इतर सहकारी घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक लोकांच्या मदतीने मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आले. सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात पाठविले असता उपचारापूर्वीच मयत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या दुर्दैवी घटनेची नोंद वळसंग पोलिस ठाण्यात झाले आहे.