महापौर भाजपचा, सत्ताही भाजपचीच अन् निलंबनही भाजपच्याच नगरसेवकाचं; सोलापूर महापालिकेतील घटना

    सोलापूर : महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत महापौर श्रीकांचना यन्नम यांच्याबाबत अपशब्द वापरल्याप्रकरणी भाजप नगरसेवक सुरेश पाटील यांना एक दिवसासाठी निलंबित करण्यात आले. शुक्रवारी महापौर श्रीकांचना यन्नम यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण सभा बोलविण्यात आली होती.

    या सभेदरम्यान घोंगडेवस्ती परिसरातील अतिक्रमण हटविण्याच्या कारवाईमुळे सभागृहात गदारोळ निर्माण झाला. या कारवाईविरोधात नगरसेवक सुरेश पाटील यांनी आक्रमक भूमिका मांडत सभागृहात माईकची तोडफोड करत महापौरांचा निषेध व्यक्त केला. निषेध व्यक्त करताना आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप करत सर्वपक्षीय नगरसेवकांनी सभागृहात निलंबनाची मागणी लावून धरली. यातील महिला नगरसेविकेने घटनेचा निषेध व्यक्त केला. अतिक्रमण हटाव भूमिकेवरुन वाढता गोंधळ पाहता महापौर यन्नम यांनी सभा तहकूब केली.

    सोलापुरात भाजपची सत्ता

    सोलापूर महानगरपालिकेत भाजपची सत्ता आहे. महापौर यन्नम या भाजप पक्षातील असून, निलंबित नगरसेवक सुरेश पाटील हे ही भाजपमधील आहेत. दरम्यान या कारवाईमुळे भाजपमध्येच खळबळ उडाली आहे. ही कारवाई जातीवादातून झाल्याचे नगरसेवक सुरेश पाटील यांचे म्हणणे आहे. या सभेस आयुक्त पी.शिवशंकर, उपमहापौर राजेश काळे यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते. महानगर पालिकेच्या इतिहासात प्रथमचं सत्ताधारी भाजप आणि विरोधी पक्षातील नगरसेवक निलंबन कारवाईसाठी एकवटले होते.