वसतिगृहाच्या अधीक्षकपदावर एकाच शिक्षकास अनेक वर्षांपासून पदस्थापना देण्यात अर्थपूर्ण व्यवहार : शिवानंद भरले

  सोलापूर : जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाने वसतिगृह अधीक्षक स्वतंत्र पद नसल्याने अतिरिक्त पदभार सांभाळण्याच्या नावाखाली अक्कलकोट तालुक्यातून उत्तर सोलापूर तालुक्यातील लोकमान्य नगरला बदली करणे म्हणजे आप्तेष्ठांना नातेवाईकांना सांभाळण्याच्या हेतूनेच “अर्थपूर्ण” व्यवहारांनी झालेली बदलीचा हा प्रकार आहे, असा आरोप महाराष्ट्र राज्य शिक्षक संघटनेचे अध्यक्ष शिवानंद भरले यांनी केला आहे.

  पुढे बोलताना अध्यक्ष भरले म्हणाले की, यापूर्वी तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी नाईक असताना स्वत:चे बंगले शेतीवाडी साभाळण्यासाठी सोमसिंग चव्हाण शिक्षकास माळशिरस तालुक्यातून नेहरू वस्तीगृहचे अधीक्षक पदावर पदस्थापना केली. मधल्या काळात ऑनलाईन बदल्यामध्ये हा शिक्षक अक्कलकोट तालुक्यातील गौडगाव शाळेत गेला. आता पुन्हा वस्तीगृहाच्या नावाखाली उत्तर सोलापूर लोकमान्य नगरला शिक्षणधिकारी संजयकुमार राठोड यांच्या आशीर्वादाने बदली करुन घेतात.

  बदली आदेशात मूळ उपशिक्षकपदाची जबाबदारी सांभाळून वस्तीगृह अधीक्षकपदाची अतिरिक्त जबाबदारी सांभाळायची म्हणतात. मग गौडगावमध्ये राहून सांभाळता येत नाही का? लोकमान्य नगरला बदली करण्याची काय आवश्यकता होती? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

  जिल्ह्यातील 1463 शिक्षक बदलीस पात्र आहेत. 70 ते 80 महिला शिक्षिका आड रानावर नोकरी करतात. काही शिक्षक वर्षानुवर्षे कुटुंबापासून लांब आहेत. यातील एखाद्या गरजू शिक्षकास मेरीटप्रमाणे पदस्थापना देण्यात येत नव्हती का? यापूर्वी सुध्दा अनेक शिक्षकांचे बदलीसाठी विभागीय आयुक्तकडे प्रस्ताव पाठवा म्हणून मागणी होती. परंतु अधिकारी यांच्या जवळच्याचे प्रस्ताव पाठवून बदली केली आहे.

  वस्तीगृहावरील खर्च हे जिल्हा परिषद उत्पन्नातून केली जाते. यावर शिक्षण समितीचे नियत्रंण असते. या खर्चावर डल्ला मारण्यासाठी प्रयत्न असतो. नेमक्या या एकाच शिक्षकास वस्तीगृह अधीक्षकपदाची अतिरिक्त जबाबदारी का दिली जाते. तो काय सरकारचा जावई आहे का ही बदली म्हणजे कुपंणानीच शेत खाल्ली असे म्हण्ण्यासारख आहे. याबाबत संघटना पातळीवर आम्ही जरूर विचार करणार आहोत.

  शिक्षणाधिकारी राठोड यांनी दिशाभूल केली

  सीईओ दिलीप स्वामी यांची प्राथमिक शिक्षणधिकारी राठोड यांनी दिशाभूल केली आहे. शासनस्तरावरून शिक्षकांच्या बदल्या संदर्भातील आदेश नसताना मर्जीतील नातलगाला खुश करण्यासाठी शिक्षणधिकारी राठोड यांनी सीईओंना बेकायदेशीर बदली करण्यास भाग पाडले आहे.