सोलापूरचे जिल्हाधिकारी ‘ऑन ड्युटी’ २४ तास; रात्री-अपरात्रीही नागरिकांच्या सेवेत

    सोलापूर : कोरोना संसर्ग आणि त्याला आटोक्यात आणणारी यंत्रणा याविषयी चविष्ट चर्चा सुरु असतात. भावनेच्या भरात प्रशासनाच्या नावे बोटे मोडणे सोपे आहे. परंतु प्रत्यक्ष प्रशासन काय करते. हे कोणाला ठाऊक आहे का? आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर हे चोवीस तास या संकटसमयी लोकांच्यासाठी धडपड करतायेत. यावर कोणी विश्वास ठेवणार नाही. परंतु हे खरे आहे. कडक निर्बंधातून प्रवेश मिळविलाच तर जिल्हाधिकारी कार्यालय गाठा. बाहेर कलेक्टरांची गाडी दिसेलच. पहाटेच्या दरम्यान, ‘शिवदर्शन’ या बंगल्यातल्या कार्यालयात कलेक्टर कोणाशी तर बोलतच आहेत. हेच चित्र दिसेल. परंतु दुर्दैव असे की हे पडद्यामागील चित्र सर्वसामान्यांना दिसत नाही.

    दाेन वेळा केली काेराेनावर मात

    गेल्या दीड वर्षांपासून संपूर्ण देशासह सोलापूर शहर जिल्ह्यात कोरोनाने मुक्काम ठोकला आहे. कोरोना संसर्ग अटोक्यात आणण्यासाठी लावल्या जाणाऱ्या कडक निर्बंधामुळे जनता आणि प्रशासन यातील संघर्ष कुठेतरी उफाळून येताना दिसून येईल. परंतु कोरोनाचे संकट रोखणे केवळ प्रशासनाच्या हाती नाहीच. विविध पातळ्यांवर दिलेली जबाबदारी. त्यावरील नियंत्रण याकडे पाहताना नागरी कर्तव्य देखील पहावे लागतात. या कर्तव्यांमध्ये कसूर झाल्याचे कळातच यंत्रणा दंडात्मक कारवाई करते. आणि त्याचा रागही जिल्हा प्रशासनाला घ्यावा लागतो. रोष… राग… अन संताप समजून घेत निर्बंधांचा अंमल करणे आणि कोरोना रोखणे अशा सर्वस्व पातळ्यांवर एकमेव योध्दा दिसेल लढताना. त्यांचे नाव मिलींद शंभरकर. आडनाव शंभरकर असले तरी शंभरपेक्षा अधिक जबाबदाऱ्या. शंभरपेक्षा अधिक घटक यांच्याशी नीत्य संपर्कात राहून हा माणूस दोनवेळा कोरोनावार मात करुन यशस्वीपणे पुन्हा सोलापूर जिल्हावासियांच्या सेवेत आला.

    रात्री अपरात्री नागरिकांच्या सेवेत

    सकाळी नऊ वाजल्यापासूनच जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयीन कामकाजाचा धडका सुरु होतो. तो पहाटे १ ते दोन वाजेपर्यंत सुरुच असतो. दिवस कार्यालयात येणाऱ्या अभ्यागतांच्या समस्या जाणून घेणे. विविध विषयांवरील बैठका घेणे. मंत्री व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकांमध्ये व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे सहभाग घेणे हा जिल्हाधिकाऱ्यांचा दैनंदीन कार्यक्रम रात्री सात वाजेपर्यंत सुरुच असतो. रात्री आठ वाजल्यापासून पुन्हा शिवदर्शन बंगल्यातील कार्यालयात कोरोनाच्या पार्श्वभूमीवरचा आढावा. जिल्ह्यातील सर्व अधिकाऱ्यांनी दिवसभरात काय काम केले. कोरोनाची स्थिती, विकासकामांचा आढावा व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे घेणे. राहीलेल्या फाईंल्सवर सह्या करणे. हा दैनंदीन कार्यक्रम रात्री १ ते २ वाजेपर्यंत सुरुच असतो. पहाटेच्यावेळी एक छोटीसी डुलकी घेऊन पुन्हा सकाळी नऊ वाजता जिल्हाधिकारी सोलापूरकरांच्या सेवेसाठी हजरच असतात.