मंगळवेढ्याचे की पंढरपूरचे ‘समाधान’

निवडणूक होताच आमदारांना पंढरपूरचा पडला विसर

  पंढरपूर / राजेश शिंदे : पंढरपूर मंगळवेढा विधानसभा निवडणूक २०२१ ही ‘करेक्ट फिल्डींग’ लावत, उमेदवार समाधान आवताडे यांनी ठरल्याप्रमाणे करेक्ट कार्यक्रम करत निवडून आल्यानंतर आमदार आवताडे (Samadhan Autade) यांनी मंगळवेढ्याचे प्रश्न सोडवण्यासाठी जोर लावला आहे. मात्र हे करताना त्यांनी पंढरपूरकडे मात्र पाठ फिरवल्याचे चित्र समोर येत आहे. ऊस तोडणी कामगारांचा प्रश्न असो किंवा कोरोनाच्या बाबतीत आरोग्याचा विषय असो, अथवा विकासकामांचा आढावा घेण्यासाठी गाव भेट दौरा असो. या सर्वासाठी आमदार आवताडे यांनी केवळ मंगळवेढा तालुका डोळ्यासमोर ठेवल्यामुळे त्यांना मतदान करणाऱ्या पंढरपूरकरांची घोर निराशा झाली आहे.

  आकडेवारी डोळ्यासमोर कामे

  नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा पोटनिवडणुकीत झालेल्या दुरंगी लढतीत भाजपाचे उमेदवार समाधान आवताडे यांनी राष्ट्रवादीच्या भगीरथ भालके यांचा सुमारे ३७०० म्हणजेच थोडक्या मतांनी निसटता पराभव केला. या निवडणुकीमध्ये झालेल्या पराभवाचे स्पष्टीकरण देताना राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शेवटच्या दोन दिवसात चमत्कार झाला. त्यामुळे राष्ट्रवादीला ही जागा गमवावी लागल्याचे पत्रकार परिषदेत स्पष्ट केले होते. मतदार संघातील मतदारांना देखील हा विजय म्हणजे दामाजीपंतांची कृपा असल्याचे चांगलेच ठाऊक होते.

  पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे दिवंगत आमदार भारत भालके यांनी पंढरपूर व मंगळवेढा या दोन्ही तालुक्यांना समान न्याय देत तळागाळातील मतदारांचा विचार केला. त्याआधी सुधाकरपंत परिचारक यांनीदेखील समोरची व्यक्ती कुठल्या पक्षाची, विचाराची, गटाची किंवा गावची आहे, याकडे दुर्लक्ष करून जनसामान्यांचे प्रश्न सोडविले. मात्र २०२१ चे पंढरपूर मंगळवेढ्याचे नवनिर्वाचित अामदार मिळालेल्या मताधिक्याची आकडेवारी डोळ्यासमोर ठेवून विकासाची स्वप्ने पूर्ण करताना दिसत आहेत, असे दिसते.

  गुलाल पडताच मतदार वाऱ्यावर

  विधानसभा निवडणूक मतमोजणीच्या वेळी शेवटच्या टप्प्यात विजय दृष्टीपथात आल्याचे दिसताच वाड्यावर हजेरी लावणारे आमदार गुलाल अंगावर पडताच पंढरपूर तालुक्याच्या मतदारांना सहज विसरून गेले आहेत. कोरोना विषयक शासकीय विभागांची आढावा बैठक घेतल्यानंतर, त्यांनी मतदार संघातील पहिला प्रश्न मांडत, ऊस तोडणी कामगारांच्या विषयी शासनाकडे मागणी केली. मात्र या मागणीत, ‘मंगळवेढा तालुक्यातील ऊस तोडणी कामगार’ असा उल्लेख केला.

  खरेतर मूळ ऊस तोडणी कामगार बहुतांशी मराठवाड्यातील आहेत. मात्र आपल्याच मतदारसंघातील केवळ एका तालुक्याच्या ऊस तोडणी कामगारांविषयी मागणी केली गेली. त्यानंतर मतदारसंघातील प्रस्तावित विकास कामांचा आढावा घेण्यासाठी गावभेट दौऱ्याचे नियोजन देखील मंगळवेढा तालुका डोळ्यासमोर ठेवूनच केले गेले. मात्र विकास कामांसाठी असा गाव भेट दौरा पंढरपूर तालुक्यात झाल्याची माहिती हाती येत नाही. अशा प्रकारामुळे पंढरपूर तालुक्यातील मतदार संभ्रमात सापडले असून, दगडापेक्षा वीट मऊ म्हणणे देखील आता अंगलट आल्याची कुजबुज तालुक्‍यात सुरू झाली आहे.

  पंढरपूरच्या करमाफीवर तोंड उघडणार का ?

  एकीकडे पंढरपूर शहरातील व्यापाऱ्यांचे अर्थकारण लॉकडाउनमुळे डबघाईला आले आहे. तर दुसरीकडे पंढरपूर शहरामध्ये पाणीपुरवठा, रस्ते आणि आरोग्यविषयक प्रश्नही प्रलंबित आहेत. गेल्या दोन वर्षात यात्रा न भरल्यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या व्यापाऱ्यांची, नगरपालिका करमाफी व्हावी, अशी मागणी आहे. मात्र विधानसभा निवडणुकीमध्ये मदत करणाऱ्या परिचारकांकडे नगरपालिकेची सत्ता असल्यामुळे पंढरपूर मंगळवेढ्याचे लोकप्रतिनिधी या प्रश्नांवर तोंड उघडणार का?