…तरच शेतकरी समृद्ध होईल : अरुण लाड

  माढा : जग बदलत चालले आहे. त्यानुसार बदलणे गरजेचे आहे. वेगळी वाट निवडून शेतकऱ्यांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा. शेतीचे मुलभूत ज्ञान घेऊन शेतीची कास धरली तरच शेतकरी यापुढील काळात समृध्द होऊ शकतो, असे मत पुणे पदवीधर मतदारसंघाचे आमदार अरुण लाड (Arun Lad) यांनी व्यक्त केले.

  माढा तालुक्यातील निंमगाव (टे) येथे अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज अशा माती, पाणी, पान व देठ परीक्षण प्रयोगशाळेचा भूमिपूजन समारंभ मंगळवारी पार पडला. यावेळी अरुण लाड बोलत होते. अरुण लाड, आमदार बबनराव शिंदे, संजय शिंदे, फिनोलेक्स कंपनीचे विक्री व विपणन विभागाचे अध्यक्ष प्रदीप शास्त्री वैदूला, राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राचे संचालक डाॅ. राजीव मराठे यांच्यासह अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत श्रीफळ वाढवून प्रयोगशाळेचे भूमिपूजन पार पडले.

  तसेच कोनशिला अनावरण  देखील करण्यात आले. अरुण लाड म्हणाले, माणूस आजारी पडला की आरोग्य तपासणी करतो. शेतीतून भरघोस उत्पन्नाची अपेक्षा ठेवताना शेतीचे तपासणी/परीक्षण देखील होणे ही तितकेच गरजेचे आहे. रासायनिक खतांचा बेसुमार वापर होत चालल्याने शेतीचा पोत बिघडत चाललेला आहे. त्यासाठी सेंद्रीय खताचा वापर वाढवणे आवश्यक आहे. सध्या महागाईचा काळ असल्याने शेतीचा खर्च देखील वाढला आहे. कमी खर्चात जास्त उत्पादन मिळवायचे असेल तर
  शेतीचे परीक्षण करणे उचित ठरेल. यातून जमिनीची सुपिकता वाढते.

  माढा वेल्फेअर फाउंडेशनचे अध्यक्ष धनराज शिंदे यांनी प्रास्ताविकेतून शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन आणि त्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळण्यासाठीच विठ्ठ्ल गंगा फार्मर्स प्रकल्पाच्या उभारणीचे काम सुरु असून, प्रयोगशाळेत शेतकऱ्यांच्या शेतातील माती, पाणी, पान, देठ याचे परीक्षण करुन अहवाल पाहूनच शेतकऱ्यांना मार्गदर्शन, औषधमात्रा दिली जाणार आहे. २० कोटी रुपयांच्या हा प्रकल्प शेतकऱ्यांना फायदेशीर ठरणार असल्याचे सांगतानाच माढा वेल्फेअर फौंडेशनच्या कार्याचा आढावा त्यांनी मांडला.

  आमदार बबनराव शिंदे म्हणाले, सध्याचीच पारंपरिक पिके घेण्यापेक्षा त्याला बगल देत शेतीत नवे प्रयोग राबवायला हवे. केवळ शेतीवर अवलंबून न राहता जोडधंद्याचा मार्ग स्वीकारावा.

  पुणे, पिंपरी-चिंचवडच्या पाण्याने शेतं पांढरी : बबनराव शिंदे

  पुणे व पिंपरी-चिंचवडचे पाणी उजनीत येत असल्याने या पाण्याने शेतातली रानं देखील पांढरी पडली आहेत. यामुळे नुकसान होत चालले आहे. ग्रामीण भागातील तरुणांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांना चावडीवर व चौकात नावे ठेवण्याचे उद्योग बंद करावे, असे म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. सुशिक्षित तरुणांनी शेती क्षेत्रात नवे प्रयोग करण्याचा सल्ला देखील शिंदे यांनी यावेळी दिला.