पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात मोहोळ काँग्रेसचे आंदोलन; मोदी सरकारविरोधात घोषणाबाजी

    मोहोळ : केंद्रातील मोदी सरकारने केलेल्या पेट्रोल, डिझेल व गॅस दरवाढी विरोधात मोहोळ तालुका काँग्रेसच्या वतीने मोहोळ शहरातील कादे पेट्रोल पंपासमोर आंदोलन करून मोदी सरकारचा निषेध करण्यात आला.

    केंद्रातील मोदी सरकारने पेट्रोल, डिझेल व एलपीजी गॅसच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढविल्या आहेत. पेट्रोलने १०० रुपये लिटरचा टप्पा पार केला असून, डिझेल ९२ रुपये लिटर झाले आहे. या दरवाढीच्या निषेधार्थ मोहोळ तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोक देशमुख यांच्या नेतृत्वाखाली मोहोळ शहरातील कादे पेट्रोल पंपासमोर आंदोलन करून मोदी सरकारचा निषेध करण्यात आला.

    यावेळी अशोक देशमुख म्हणाले की, ही भाववाढ अशीच चालू राहिली तर डिझेल १०० रुपये लिटर होण्यास फार दिवस लागणार नाहीत. स्वयंपाकाचा गॅसही ९०० रुपये झाला आहे. या महागाईमुळे लोकांचे जगणे कठीण झाले आहे. आधीच कोरोनाच्या संकटाने जनता त्रस्त आहे, त्यात महागाईचा मार सहन करावा लागत आहे. मोदी सरकारने पेट्रोल-डिझेलमधून कराच्या रुपाने लाखो कोटी रुपये नफा मिळवून सामान्य जनतेला मात्र महागाईच्या खाईत लोटले आहे.

    या आंदोलनावेळी ‘लुटेरी मोदी सरकार, पेट्रोल हुआ सौ पार!’, पेट्रोल महंगाई से जनता बेहाल, मोदी के पूंजीपती मित्र मालामाल !, पेट्रोल डिझेल शंभर पार, मोदी बस्स करा जनतेची लुटमार ! अशा घोषणा देण्यात आल्या.

    या आंदोलनात काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अशोक देशमुख, माजी नगराध्यक्षा शाहीन शेख, शबाना तांबोळी, नफिसा शेख, सागर देशमुख, अमजद शेख, राजेंद्र मोटे, तय्यब शेख, संतोष शिंदे, राहुल कुर्डे, सुनील टिळेकर, सुरेश अप्पा शिवपुजे, रशीदखाँ पठाण, कृष्णदेव वाघमोडे आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.