प्रतीकात्मक फोटो
प्रतीकात्मक फोटो

८ लोक गोलाकार बसून पैशाच्या पैजेवर बावन्न पानांचा "मन्ना" नावाचा जुगार खेळत असल्याचे आढळले. त्यामुळे पोलिसांनी गराडा घालून त्या सर्वांना ताब्यात घेतले.

    मोहोळ:मोहोळ तालुक्यातील बिटले येथील जुगार अड्ड्यावर रविवार ४ एप्रिल रोजी मोहोळ पोलिसांनी छापा टाकून सुमारे २ लाख ८१ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. पोलिसांनी ८ जुगाऱ्यांना ताब्यात घेऊन त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

    सचिन बब्रुवान शिंदे, भारत भिमाशंकर कोळेकर (रा.निराळे वस्ती सोलापूर), नवनाथ विश्वनाथ देवकते (रा. समर्थनगर मोहोळ), गोवर्धन काळे, गोरख विठोबा शिंदे, पटुशा बळीराम शिंदे, शकील वजीर तांबोळी, महादेव कोंडिबा वगरे (रा. बिटले ता. मोहोळ) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.
    याबाबत मोहोळ पोलिस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, मोहोळ तालुक्यातील बिटले गावातील मेसाई मंदिराच्या शेजारी जुगार अड्डा सुरू असल्याची गोपनीय माहिती मोहोळ पोलीस प्रशासनाला मिळाली होती. त्यानुसार पोलिस निरीक्षक अशोक सायकर यांनी रविवार ४ एप्रिल रोजी पोलिस नाईक शरद ढावरे, पो. कॉ. गणेश दळवी, पो. कॉ. पांडूरंग जगताप यांचे पथक कारवाईसाठी रवाना केले. सदर पोलिस पथकाने बिटले येथील मेसाई मंदिराशेजारी सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकला.
    यावेळी ८ लोक गोलाकार बसून पैशाच्या पैजेवर बावन्न पानांचा “मन्ना” नावाचा जुगार खेळत असल्याचे आढळले. त्यामुळे पोलिसांनी गराडा घालून त्या सर्वांना ताब्यात घेतले. यावेळी पोलिसांनी त्यांच्याकडून २ लाख ८१ हजार ४५० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. या प्रकरणी मोहोळ पोलिसातवरील आठ जणांच्या विरोधात जुगार बंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस नाईक शरद ढावरे हे करीत आहेत.