कृष्णा भीमा स्थिरीकरण योजना हाणून पाडायचा शरद पवारांचा डाव; रणजितसिंह यांची टीका

    अकलुज : राज्यातील अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या कृष्णा भीमा स्थिरीकरण प्रकल्प व पंढरपूर लोणंद रेल्वे मार्गासाठी केंद्र सरकार अनुकूल आहेत. परंतु राज्य सरकार व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विरोधामुळे व केंद्राच्या प्रकल्पाला मदत न करण्याच्या भूमिकेमुळे दोन्ही प्रकल्प प्रलंबित असल्याचे स्पष्टीकरण खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिले.

    अकलूज माळेवाडी ग्रामपंचायतीचे नगर परिषदेत व नातेपुते ग्रामपंचायतीचे नगरपंचायती ते रूपांतर करण्याच्या मागणीसाठी 22 जूनपासून तीनही गावचे नागरिक साखळी उपोषण करत आहेत. आज उपोषणाच्या 25 व्या दिवशी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी भेट देऊन उपोषण करत यांची चर्चा केली. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.

    रणजितसिंह म्हणाले, अकलूजच्या उपोषणाचा 25 वा दिवस उजाडला तरी दखल घेतली जात नाही. हे दुर्दैवी आहे. मी या प्रकरणात लक्ष घालून याबाबतची तांत्रिक माहिती घेऊन संसदेच्या पावसाळी अधिवेशनात लक्षवेधी मांडणार आहे. हे केंद्र सरकार जागरूक असल्याने याची दखल घेऊन नक्की न्याय करेल याची मला खात्री आहे. पंढरपूर लोणंद रेल्वे मार्गाविषयी खासदार निंबाळकर म्हणाले, या रेल्वेमार्गाच्या सर्वेक्षणाचे काम अंतिम टप्प्यात आहे. याचा अहवाल आल्यानंतर यासाठी निधी उपलब्ध होणार आहे. प्रस्तावित असलेल्या मुंबई-हैदराबाद बुलेट ट्रेनचा मार्ग बदलण्यात येणार नसल्याचे स्पष्टीकरण देतानाच त्यांनी कृष्णा भीमा स्थिरीकरण योजना हाणून पाडण्याचा राष्ट्रवादीचा डाव असल्याचा आरोप केला.

    …म्हणून हा विषय प्रलंबित

    केंद्र सरकारची निधी द्यायची तयारी आहे. परंतु आपला वाटा देण्यास राज्य सरकार तयार नाही. यामुळेच हा विषय प्रलंबित राहत असल्याचे खासदार नाईक निंबाळकर यांनी सांगितले. आजच्या उपोषणात उपसरपंच शिवतेज सिंह मोहिते पाटील, भाजपा जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, सातारा जिल्हा भाजपाचे उपाध्यक्ष जयकुमार शिंदे, स्वराज्य पतसंस्थेचे चेअरमन अमरसिंह नाईक निंबाळकर यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी पाठिंब्याचे निवेदन दिले.