विक्रीसाठी आणलेले चिखल कासव पोलिसांनी केले हस्तगत; आठ आरोपी ताब्यात

    सोलापूर / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : सोलापूर गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे सोलापूर कर्नाटकातून सोलापुरात विक्रीसाठी आणलेले चिखल कासव सोलापूर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी हस्तगत केले. या गुन्ह्यात आठ आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच या गुन्ह्यात वापरण्यात आलेले १० लाख ६५ हजारांचे तीन वाहने पोलीसांनी जप्त केले आहे.

    याबाबत जेलरोड पोलीस ठाण्यात रात्री उशीरा गुन्हा दाखल झाला आहे. अंधश्रद्धेतून सोलापुरात चिखल कासव विजापूर रोडवरुन शांती चौक पाण्याची टाकी ते मार्केटयार्ड या रोडवर विक्रीसाठी आणत असल्याची माहीती गुन्हे शाखेच्या पोलिसांना कळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून आठ आरोपींना ताब्यात घेतेले आहे. सचिन हणुमंत नायकोंडे (वय-२०,रा.गंगाधर कणबस, दक्षिण सोलापूर), बसवराज शंकर कागर (वय-२५ रा. झळकी, कर्नाटक),परशुराम अमोगसिद्ध पारसोर (वय-३०,झळकी, कर्नाटक),उत्तम सोमण्णा कागर (वय-४०, रा.झळकी,कर्नाटक),सोमण्णा शिवप्पा कागर (वय-५०, रा.झळकी, कर्नाटक),महांतेश सिद्राम काखंनडी (वय-२५ रा.हेबळगी,कर्नाटक),प्रजोल शिवानंद साबळे (वय-१९,रा.अंजोडगी,कर्नाटक), सिद्धाराम शिवप्पा कागर (वय-२३,रा.झळकी, कर्नाटक) या संशयितांना पोलिसांनी कासवासह ताब्यात घेतले.

    संशयित आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून, त्यांच्याकडून दोन कार, एक दुचाकी जप्त करण्यात आली आहेत. ही कारवाई पोलीस आयुक्त शिंदे, उपायुक्त बापू बांगर, वरिष्ठ पोलिस निरिक्षक संजय साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक संजय क्षीरसागर, वनरक्षक शुभांगी कोरे,वनपाल शंकर कुताटे,पोलिस अंमलदार बाबर कोतवाल,संजय काकडे,स्वप्निल कसगावडे,उमेश सावंत,संजय काकडे,लक्ष्मण उडाणशिव,विनायक बरडे, संदिप जावळे,विजय वाळके यांनी केली.