सोलापूरातील ‘या’ गावची कोरोनामुक्त गाव म्हणून निवड

    सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुळेगाव तांडा या गावची कोरोनामुक्त गाव म्हणून निवड करण्यात आली. सोलापूर जिल्ह्यातून एकूण 40 ते 50 गावांची कोरोनामुक्त गाव म्हणून निवड करण्यात आली. सोलापूर जिल्हा परिषदेचे सीईओ दिलीप स्वामी यांनी केलेल्या कोरोनामुक्त गाव या आवाहनास मुळेगाव तांड्यचे सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, आशा वर्कर, आरोग्य कर्मचारी, शिक्षक यांनी उत्तम प्रतिसाद देऊन गाव कोरोनामुक्त केल्यामुळे त्यांचा सत्कार पोलीस अधीक्षक ग्रामीण तेजस्वी सातपुते यांच्या हस्ते करण्यात आला.

    कार्यक्रमाचे प्रास्ताविकपर भाषणात सरपंच विजय उमाकांत राठोड यांनी गाव कोरोनामुक्त होण्यासाठी केलेल्या परिश्रमांची माहिती दिली. प्रत्येक घरोघरी जाऊन नागरिकांचे कोरोना टेस्ट करून पॉझिटिव्ह रुग्णांना कोविड सेंटरमध्ये दाखल करून घेणे, त्यांची अँटीजन टेस्ट करणे, थर्मल स्कॅनिंग करणे यासाठी आशा वर्कर, आरोग्य कर्मचारी, पोलीस, ग्रामसेवक, तलाठी व शिक्षक यांनी घेतलेल्या परिश्रमामुळेच गाव कोरोनामुक्त झाल्याचे त्यानी सांगितले. तसेच मुळेगाव तांडा या गावाकडे लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळाच आहे. मुळेगाव तांडाच्या बाबतीत अनेक आरोप होतात. पण प्रत्यक्षात तशी परिस्थिती नाही. आज गावात अनेक बदल झाल्याचे त्यांनी सांगितले. गावातील प्रत्येक नागरिक स्वतः मध्ये बदल घडविण्यास तयार आहे. त्यांच्या रोजगाराची व्यवस्था शासकीय स्तरावर प्रयत्न केल्यास गाव पूर्णपणे बदलू, असे आश्वासन सरपंच विजय उमाकांत राठोड यांनी दिली.

    या कार्यक्रमावेळी सातपुते यांनी गावकऱ्यांना मार्गदर्शन करताना माणूस ठरवले तर काही करू शकतो. त्यासाठी फक्त इच्छाशक्ती पाहिजे. यापुढे शिक्षणाची कास धरून गावची व्यसनमुक्तीकडे वाटचाल करण्यास सांगितले. तसेच स्वतः प्रयत्न करून रोजगाराची निर्मिती करावी व गाव व्यसनमुक्ती करावे. त्यासाठी सर्व गावकऱ्यांनी प्रयत्न करावे, असे आवाहन त्यांनी केले.

    यावेळी गाव कोरोनामुक्त करण्यासाठी केलेल्या आरोग्यसेविका डॉक्टर फुलारी, स्वामी, शिंगे, आशा वर्कर रेखा राठोड ,सविता राठोड ,दिपाली कुंभार, अंगणवाडी सेविका आहेरवाडी, लक्ष्मी चव्हाण, अनारकली , मदतनीस सुनिता राठोड ,गंगुबाई चव्हाण , मुमताज शेख ,ग्रामसेवक शरणाप्पा तोळ्णूरे, विस्ताराधिकारी कमळे ,तलाठी अनिल भोसले , किसनराव मागास समाज सेवा शिक्षण शिक्षण मंडळाचे मुख्याध्यापक नागेन्द्र हिप्परगी , शिवकुमार रेऊरे , रमेश राठोड व जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापिका कस्सा, तसेच पोलीस कर्मचारी यांचे ही पोलीस अधीक्षक ग्रामीणचे तेजस्वी सातपुते यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.