बहिणीस नांदवण्यास नकार देणाऱ्या सासूचा खून; आरोपी वकिलाची निर्दोष मुक्तता

    सोलापूर : महिलेचा खून केल्याप्रकरणी इंडी येथील वकिली करणारा सिद्धगौडा उर्फ सिद्धगौडाप्पा बाबूगौडा पाटील (वय 34, रा. इंडी, जिल्हा विजापूर) याच्यावर गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणाची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. जी. मोहिते यांच्यासमोर झाली. त्यांनी गुन्हा सिद्ध न झाल्याने आरोपींची निर्दोष मुक्तता केली.

    गंगाबाई श्रीशैल बनगोंडे (वय 62 रा. बनशंकरी निवास, विरशैव नगर, विजापूर रोड, सोलापूर) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत माहिती अशी की, यातील आरोपी सिद्धगौडा याची बहिण शिल्पा हिचे लग्न गंगाबाई यांचा मुलगा राहुल याच्यासोबत 2015 साली झाले होते. लग्नानंतर शिल्पा ही सासरी सहा महिने व्यवस्थित राहिली. त्यानंतर पती-पत्नीमध्ये वाद-विवाद झाल्याने शिल्पा हिने सिद्धगौडा यास बोलावून घेऊन माहेरी निघून गेली होती. शिल्पा ही 2016 पासून माहेरीच होती व नोंदविण्यासाठी बऱ्याचशा बैठका झाल्या. त्यामध्ये काहीही तडजोड झाली नाही.

    मार्च 2016 मध्ये आरोपीने गंगाबाई यांना जाळून टाकण्याची धमकी दिली होती. याच गोष्टीचा राग मनात धरून आरोपीने 12 जून, 2017 रोजी मोटारसायकलवर येऊन स्वतःची ओळख पटू नये म्हणून डोक्यावर हेल्मेट घालून तसेच मोटारसायकलची नंबर प्लेट दिसू नये म्हणून ती कपड्याने झाकून विरशैव नगर येथील गंगाबाई राहत असलेल्या घरी जाऊन गंगाबाई हिस कुर्‍हाडीने वार केला व पुरावा नष्ट करण्यासाठी तिला पेटवून देऊन जीवे ठार मारले. दरम्यान, गुन्हा सिद्ध न झाल्याने आरोपींची निर्दोष मुक्तता केली.