मोहोळ पोलिस ठाण्याची नवीन इमारत व पोलिस वसाहतीचा प्रश्न लागणार मार्गी; पाच कोटींचा निधी मंजूर

  मोहोळ : मोहोळ पोलिस ठाण्याच्या नवीन इमारतीसाठी व पोलिस वसाहतीसाठी पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून, लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे येथील पोलिसांच्या अडचणी दूर होण्यास मदत होऊन काही प्रमाणात नागरिकांच्या समस्याही सुटणार आहेत.

  मोहोळ पोलीस ठाणे हे सोलापूर-पुणे ह्या दोन राष्ट्रीय महामार्गाच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेले पोलीस ठाणे आहे. तसेच पंढरपूर-सोलापूर या मुख्य मार्गावरील केंद्रबिंदू आहे. मोहोळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून राष्ट्रीय महामार्ग व राज्यमार्ग जातो. त्यामुळे आंतरराज्य गुन्हेगारीवर वचक ठेवणे गरजेचे होते. सध्या पोलिस ठाण्यात कार्यरत असणारे किमान ७० टक्के पोलिस कर्मचारी हे मोहोळ येथे पोलिस वसाहत नसल्याने सोलापूर व अन्य ठिकाणाहून ये-जा करून कर्तव्य बजावत आहेत.

  सोलापूर जिल्ह्यातील इतर पोलीस ठाण्याच्या तुलनेमध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने अत्यंत मोठ्या असलेल्या मोहोळ पोलीस ठाण्याच्या कक्षात ७६ गावे येतात. त्यामुळे कामाचा ताण जास्त आहे. उलट कर्मचाऱ्यांची संख्या देखील अपुरी आहे. त्यामुळे उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण येत आहे. वर्षभरामध्ये जवळपास हजारापेक्षा जास्त दाखल गुन्ह्यांची संख्या असते.

  पोलिस वसाहतीसह मोहोळ पोलिस ठाण्याला स्वतंत्र इमारत नाही. मोठे लॉक अप नाही. पोलिस ठाण्यात कामासाठी येणाऱ्या नागरिकांना बसण्यासाठी जागाही नाही. या ठाण्याच्या आधिपत्याखाली चार बीट व तीन दूरक्षेत्र पोलीस चौक्या कार्यरत आहेत. गुन्ह्याचा तपास करताना पोलिसावर बंदोबस्ताचा ताण असतो. त्यामुळे कर्मचारी संख्या वाढविणे देखील गरजेचे आहे. तसेच वाढत्या अपघातांमुळे पोलीस ठाण्याला सुसज्ज क्रेनची सुद्धा आवश्यकता आहे.

  २०१८ साली प्रस्ताव

  नवीन पोलिस वसाहत निर्मितीसाठी पोलीस विभागाने सन २०१८ साली प्रस्ताव दिला होता. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सध्याची वसाहत इमारतीची पाहणी करून ही इमारत राहण्यायोग्य नाही, असा अहवाल ही सादर केला आहे. सातत्याने अधिकाऱ्यांनी पत्रव्यवहार करूनही अद्याप कार्यवाही झाली नाही.

  दरम्यान, मोहोळ येथे पोलिस ठाण्याची इमारत व पोलीस वसाहत लवकर व्हावी, यासाठी पोलीस निरीक्षक अशोक सायकर यांनी आमदार यशवंत माने यांच्यामार्फत सतत दोन वर्षे पाठपुरावा केला होता. त्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे.

  ५ कोटींचा निधी मंजूर

  राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशानुसार व माजी आमदार राजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या विशेष प्रयत्नातून जिल्हा नियोजन मंडळातून मोहोळ येथील पोलिस ठाण्यासाठी नवीन सुसज्ज इमारत बांधण्यासाठी व अधिकारी कर्मचारी निवासस्थान इमारत बांधण्यासाठी पाच कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे. लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होऊन मोहोळ पोलीस ठाण्याची सुसज्ज अशी नवीन इमारत तसेच अधिकारी व कर्मचारी निवासस्थान इमारत उभा राहणार आहे, असे मोहोळचे आमदार यशवंत माने यांनी सांगितले.