नव्या कोरोनाचा धाेका : लग्न कार्यालय व कोचिंग क्लासवर धाडी टाकण्याच्या सूचना ;आरोग्यमंत्र्यांची जिल्हाधिकाऱ्यांना तंबी

कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येचा धोका लक्षात घेऊन राज्य सरकारने आता सतर्कतेने पावले टाकण्याचे ठरवले आहे. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना फोन वरून तातडीने हालचाली करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यामध्ये लग्न कार्यालयातील उपस्थितांची संख्या व कोचिंग क्लास मधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षितते विषयी उपाय, तपासणी करण्याचे सक्त आदेश त्यांनी दिले आहेत.

    पंढरपूर : कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येचा धोका लक्षात घेऊन राज्य सरकारने आता सतर्कतेने पावले टाकण्याचे ठरवले आहे. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना फोन वरून तातडीने हालचाली करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यामध्ये लग्न कार्यालयातील उपस्थितांची संख्या व कोचिंग क्लास मधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षितते विषयी उपाय, तपासणी करण्याचे सक्त आदेश त्यांनी दिले आहेत.

    दुसरी लाट येण्याचे संकेत
    राज्यात सध्या कोरोनाची दुसरी लाट येण्याचे संकेत दिसत असून कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे राज्य शासनाचे सतर्कतेचे उपाय म्हणून राज्याचे आरोग्य मंत्री डॉ. राजेश टोपे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना फोनवरून कडक सूचना दिल्या आहेत. यामध्ये मंगल कार्यालय मधून मोठ्या संख्येने लोक उपस्थित राहत असल्याच्या तक्रारी येत आहेत. ही सर्व मंगलकार्यालये धाड टाकून तपासणी करा. मंगल कार्यालयाच्या चालकांना नोटीस द्या आणि फाईन लावायला सुरुवात करा. जर तिथे बिना मास्कचे आणि नियमाधीन संख्येपेक्षा जास्त लोक असतील, तर त्यांच्यावर कारवाई करा, पहिले नोटीस द्या, आणि पुन्हा दुसऱ्यांदा हीच चूक उघडकीस आल्यास मंगल कार्यालय सील करा आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल करा, अशा सूचना केल्या अाहेत.

    गर्दीच्या िठकाणांवर कारवाई करा
    ज्या ठिकाणी कोचिंग क्लासेस सुरू आहेत, अशा ठिकाणी धाड टाकून त्या विद्यार्थ्यांना मास्क लावलेले आहेत का, सॅनिटायझरची सोय केली आहे का, हे तपासा. नसल्यास कोचिंग क्लासेस चालकांना नोटीस द्या आणि पुन्हा तीच चूक आढळल्यास त्यांचेही कोचिंग क्लासेस सील करा आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल करा. त्याचबरोबर ज्या ठिकाणी गर्दी जास्त प्रमाणात आढळते अशा ठिकाणावरही तातडीने कारवाई करा. हे सर्व तातडीने केले पाहिजे. कारण आता कोरोनाचा दुसरा टप्पा सुरू होण्याचे संकेत मिळत आहेत, असेही आरोग्य मंत्र्यांनी बजावले.

    लॉकडाऊन लागण्याची चिन्हे
    हिंगोली, परभणी, औरंगाबाद या भागातून मोठमोठे लग्न समारंभ लग्न सोहळे आयोजित केले जात आहेत आणि लॉकडाउनचे सर्व नियम धाब्यावर बसवून हे सर्व सुरू आहे. परंतु पोलिस प्रशासन आणि जिल्हाधिकारी कार्यालय यावर कोणतीही कारवाई करत नाहीत, असे आढळून येत आहे. याशिवाय खाजगी किंवा सरकारी डॉक्टरांकडे जे रुग्ण ताप किंवा तत्सम लक्षणे असणारे आजार घेऊन तपासणीसाठी येत आहेत, त्यांना हे डॉक्टर्स रुग्णाला घरी पाठवत आहेत. हे तातडीने थांबविण्यासाठी सर्व डॉक्टर्सना लेखी सूचना तातडीने पाठवा आणि अशा रुग्णाला आयसोलेट करण्याच्या लेखी सूचना द्या, आरोग्य मंत्र्यांच्या या सूचनांमुळे पुढच्या काळात काही काळामध्ये लॉकडाउन लागण्याची चिन्हे स्पष्ट दिसू लागली आहेत.