एनजीओ नर्सिंग असोसिएशनची सोलापूर सहाय्यक समाजकल्याण आयुक्त यांच्याविरोधात पोलिसात तक्रार

    अकलुज : सहाय्यक समाज कल्याण आयुक्त सोलापूर कैलास आढे यांनी कनिष्ठ लिपिक कुलदीप विभाते व तत्कालीन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग सोलापूर अमित घवले यांच्याशी संगनमत करून शासकीय रकमेचा अपहार केला म्हणून बाधित 200 विद्यार्थ्यांच्या  सह्यांसह त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून योग्य ती कायदेशीर कारवाई करावी या आशयाची तक्रार एनजीओ नर्सिंग असोसिएशन  सोलापूर जिल्हा यांच्या वतीने सदर बाजार पोलिस स्टेशन ,सोलापूर या ठिकाणी शनिवार 4 सप्टेंबर रोजी दाखल करण्यात आलेली आहे.

    गृहविभागाने 15 जानेवारी 2016 मध्ये राज्यातील महाविद्यालयाची चौकशी करण्याकरता नेमलेल्या विशेष चौकशी पथकाने जिल्ह्यातील 17 नर्सिंग महाविद्यालयाची कोणतीही चौकशी केलेली नसताना  चुकीच्या प्राप्त अहवालावर समाजकल्याण सहाय्यक आयुक्त सोलापूर यांनी अनियमीता च्या नावाखाली ज्या विद्यार्थ्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले आहे. त्या विद्यार्थ्यांकडून वसूल पात्र रक्कम वसूल करणे क्रमप्राप्त असतानाही जे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यांच्या शिष्यवृत्तीमधून नियमबाह्य पद्धतीने 3 कोटी 85 लाख रुपये इतकी वसूल पात्र रक्कम शासनाची मान्यता किंवा विद्यार्थ्यांची संमती न घेता वसूल करून कपात केलेली आहे.

    1/07/2010 च्या केंद्र सरकारच्या नियमानुसार ज्या विद्यार्थ्याने बेकायदेशीरपणे शिष्यवृत्ती मिळवलेली असेल तर ती शिष्यवृत्तीची रक्कम त्याच विद्यार्थ्यांकडून  वसूल करणे क्रमप्राप्त असतानाही समाज कल्याण सहाय्यक आयुक्त यांनी बेकायदेशीरपणे इतर विद्यार्थ्यांकडून ही रक्कम वसूल केलेली आहे यामुळे चालू शिक्षण घेत असलेल्या सध्याच्या विद्यार्थ्यांकडून बेकायदेशीर व नियमबाह्य पद्धतीने शिष्यवृत्तीची रक्कम वसूल  केल्याने हे विद्यार्थी शिष्यवृत्ती व शिक्षणापासून वंचित राहिलेले आहेत. यामुळे समाज कल्याण सहाय्यक आयुक्त कैलास आढे, अमित घवले व विभाते यांच्यावर भादवि कलम 405, 406 व 409 याचा गुन्हा केला आहे असे आढळून येत असल्याची तक्रार तक्रारदाराने केलेली आहे.

    जिल्ह्यातील 17 महाविद्यालयांपैकी धनश्री इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग मोडनिंब ता. माढा  ही संस्था दोषी असतानाही समाज कल्याण सहाय्यक आयुक्त  यांनी या संस्थेवर विशेष मेहेरबानी करून रक्कम रुपये  37 लाख  रुपये  8 /12 /2017 च्या शासन निर्णयाचा अवमान करून नियमबाह्य व पदाचा गैरवापर करून अदा केलेले आहेत म्हणून महाराष्ट्र  कृषी , पशु,मत्स्य विज्ञान  आरोग्य विज्ञान  उच्च तंत्र व व्यवसायिक शिक्षण  यामधील  अनधिकृत संस्था  व  अनाधिकृत अभ्यास पाठ्यक्रम  अधिनियम प्रतिबंध 2013 नुसार  गुन्हा केला असून मागासवर्गीय विद्यार्थ्यांची जाणीवपूर्वक पिळवणूक, फसवणूक केली असून त्यांच्यावर अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधात्मक कायद्यानेही गुन्हा दाखल करावा अशा स्वरूपाची तक्रार सहाय्यक आयुक्त समाज कल्याण सोलापूर  यांच्यावर दाखल करण्यात आली असल्याची माहिती अकलूज येथील पत्रकार परिषदेत एनजीओ नर्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. राहुल जवंजाळ यांनी दिली.