घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनात उत्तर सोलापूर तालुक्याने राज्यात आदर्श निर्माण करावा- उपमुख्य कार्यकारी अधिकारी गोरख शेलार

यावेळी पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी डॉ.जस्मिन शेख यांनी उत्तर सोलापूर तालुक्यातील सर्व गावामध्ये वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छता सुविधांची पडताळणी करून स्वच्छता ही शाश्वत ठेवण्याचे काम हे दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणे वेळेत पूर्ण करावे

    सोलापूर: जिल्ह्यात सर्वप्रथम हागणदारीमुक्त झालेला उत्तर सोलापूर तालुका स्वच्छ भारत मिशन ( ग्रामीण ) टप्पा क्र.२ अंतर्गत गावातील पाणी व स्वच्छतेबाबतच्या घटकांची पडताळणी करुन विशेषतः घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन अतिशय चांगल्या पद्धतीने करुन या तालुक्याने राज्यात आदर्श निर्माण करावा असे आवाहन उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता ) गोरख शेलार यांनी केले.
    स्वच्छ भारत मिशन ( ग्रामीण ) टप्पा क्र.२ (ओडीएफ प्लस ) अंतर्गत हागणदारीमुक्त झालेल्या उत्तर सोलापूर तालुक्यातील पाणी व स्वच्छतेबाबत घटकांची पडताळणी करुन घनकचरा व सांडपाण्याचे व्यवस्थापन करावयाचे आहे. यासाठी पंचायत समिती, उत्तर सोलापूर येथे आज पंचायत समितीचे विभाग प्रमुख, ग्राम विकास अधिकारी, ग्रामसेवक यांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता ) गोरख शेलार हे बोलत होते.यावेळी पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी डॉ.जस्मिन शेख , जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षचे जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव, डॉ.ए.सी.मुजावर, सचिन सोनवणे, शंकर बंडगर, महादेव शिंदे, प्रशांत दबडे, यशवंती धत्तुरे, अर्चना कणकी, दिपाली व्हटे, कनिष्ठ सहाय्यक अधिकारी नागेश धोत्रे, कनिष्ठ अभियंता गाडेकर, विस्तार अधिकारी अमोल तोडकरी, शंकर पाथरवट सी.आर.सी.अनंत सितापराव , मोनिका दिनकर , राहूल बाबरे आदी उपस्थित होते.
    यावेळी पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी डॉ.जस्मिन शेख यांनी उत्तर सोलापूर तालुक्यातील सर्व गावामध्ये वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छता सुविधांची पडताळणी करून स्वच्छता ही शाश्वत ठेवण्याचे काम हे दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणे वेळेत पूर्ण करावे असे सांगितले.सदर बैठकीत पाणी गुणवत्ता सल्लागार डॉ.ए.सी.मुजावर , स्वच्छता तज्ञ महादेव शिंदे, विस्तार अधिकारी अमोल तोडकरी यांनी स्वच्छ भारत मिशन ( ग्रामीण ) टप्पा क्र.२ (ओडीएफ प्लस ) अंतर्गत हागणदारीमुक्त झालेल्या गावामध्ये पाणी व स्वच्छतेबाबत घटकांची पडताळणी कशी करावयाची , घनकचरा व सांडपाण्याचे व्यवस्थापन कसे करावयाचे आहे याबाबत शासनाच्या मार्गदर्शक सुचनांप्रमाणे माहिती सांगितली.